द्रविडवर विश्वास कायम, बीसीसीआयने केली द्रविडसह संपूर्ण सहकारी स्टाफच्या करारात वाढ

वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला जगज्जेतेपद मिळविण्यात अपयश आले असले तरी दमदार कामगिरी करणाऱ्या संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह संपूर्ण सहकारी स्टाफवर बीसीसीआयने आपला विश्वास कायम ठेवला आहे. बीसीसीआयने सर्वांच्या करारात वाढ केली असली तरी ती वाढ किती काळासाठी आहे, हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. तरीही विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही वाढ किमान आगामी टी-20 वर्ल्ड कपपर्यंत असेल.

हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा दोन वर्षांचा करार वर्ल्ड कपसह संपला होता. त्यामुळे वर्ल्ड कपनंतर नव्या प्रशिक्षकाच्या हाती टीम इंडिया सोपवली जाणार, असे अंदाज बांधले जात होते. मात्र वर्ल्ड कपमधील संघाच्या दमदार कामगिरीनंतर बीसीसीआयने द्रविड आणि  सहकारी प्रशिक्षकांवरच आपला विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आजच द्रविडकडे करारवाढीचा प्रस्तावही ठेवला होता आणि द्रविडनेही त्या प्रस्तावाला आपला हिरवा पंदील दाखवला. त्यामुळे द्रविडसह सहाय्यक प्रशिक्षक विक्रम राठोड (फलंदाजी), पारस म्हांब्रे (गोलंदाजी) आणि टी. दिलीप (क्षेत्ररक्षण) यांचाही करार वाढवण्यात आला आहे.

गेल्या आठवडय़ात बीसीसीआयने द्रविडशी चर्चा केली तेव्हाच त्याच्या करारात वाढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. आज द्रविडने तो प्रस्ताव स्वीकारला असल्याचे जाहीर करून त्यावर शिक्कामोर्तब केले. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली हिंदुस्थानी संघाच्या कामगिरीत उल्लेखनीय प्रगती झाल्याचे दिसल्यामुळे तेच सातत्य कायम राखले जावे म्हणून बीसीसीआयने हा करार वाढवल्याचे कळले आहे. नव्या प्रशिक्षकामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, याची कल्पना असल्यामुळे बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्याऐवजी द्रविडवरच विश्वास कायम ठेवण्याची आपली भूमिका जाहीर केली.

द्रविडच्या कराराच्या कार्यकाळाबाबत अनिश्चितता

गेली दोन वर्षे द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळत आहे. आता नव्याने करार केल्यानंतर त्याचा कार्यकाळ येत्या 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपासून पुन्हा सुरू होईल. दक्षिण आफ्रिकेच्या या दौऱ्यात हिंदुस्थान तीन वन डे, तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यानंतर जूनमध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. द्रविड आणि सहकारी प्रशिक्षकांचा नवा कार्यकाळ किती महिन्यांचा आहे याबाबत बीसीसीआयने काहीही जाहीर केलेले नाही. मात्र टी-20 वर्ल्ड कपपर्यंत हा करार निश्चित मानला जात आहे. म्हणजेच पुढील सहा महिने द्रविड संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडेल. नोव्हेंबर 2021 मध्ये हिंदुस्थानी संघ टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत हरला तेव्हा रवी शास्त्राr यांच्याकडून द्रविडने ही जबाबदारी घेतली होती. त्यानंतर द्रविडशी दोन वर्षांसाठी म्हणजेच वन डे वर्ल्ड कपपर्यंत करार करण्यात आला होता.

सर्वोत्तम कामगिरीसाठी कटिबद्ध – राहुल द्रविड

टीम इंडियासोबतची गेली दोन वर्षे संस्मरणीय राहिली आहेत. यादरम्यान आम्ही अनेक चढउतार पाहिले. यादरम्यान मला माझ्या खेळाडूंनी आणि सहकाऱ्यांनी सदैव पाठिंबा दिला. त्यामुळे ड्रेसिंग रूमचे वातावरणही अत्यंत खेळीमेळीचे राहिले, ज्याचा मला सदैव अभिमान राहील. बीसीसीआयनेही माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. या जबाबदारीसाठी मला अनेक काळ कुटुंबापासून दूर राहावे लागते. यादरम्यान कुटुंबाने केलेला त्याग आणि दिलेल्या पाठिंब्याचे मनापासून कौतुक आहे. त्यांची पडद्यामागची भूमिका महत्त्वाची आहे. वर्ल्ड कपनंतर आमच्यासमोर नवीन आव्हाने उभी आहेत आणि आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी कटिबद्ध आहोत.