महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण, हार्दिक, लोकेशला 20 लाखांचा दंड

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना बीसीसीआयच्या लोकपाल समितीचे डी. के. जैन यांनी प्रत्येकी 20 लाखांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम अर्धसैनिक दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना तसेच अंध क्रिकेटपटूंना देण्याचे आदेश दोघांना देण्यात आले आहेत.

हे दोन्ही खेळाडू एक-एक लाख रुपये दहा शहीद अर्धसैनिक दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देणार असल्याचे बीसीसीआयच्या लोकपाल समितीने म्हटले आहे. तसेच  दोघांना तेवढीच रक्कम अंध क्रिकेटपटूंसाठी द्यावी लागणार आहे. ही रक्कम त्यांना चार आठवड्यांमध्ये जमा करावी लागणार आहे. ही रक्कम दोघे नियोजित वेळेत भरू शकले नाहीत तर ती त्यांच्या क्रिकेट सामन्यातील मानधनामधून कापण्यात येईल असेही बीसीसीआयच्या लोकपाल समितीने स्पष्ट केले आहे.