
आशिया कपचे विजेतेपद हिंदुस्थानने डंखासारख्या फटक्याने जिंकले. मैदानात चेंडू उडाले, झेंडे फडकले आणि शेवटचा षटकार सीमारेषा ओलांडताच संपूर्ण उपखंडाला समजले की, आशियाचा बादशहा कोण आहे. पण या विजयानंतर महिनाभर उलटला तरी अजूनही ट्रॉफी मुंबईत पोहोचलेली नाही. जणू मैदानावर हरलेले आता कागदोपत्री सूड घेतायत. ट्रॉफी दिली तर पराभव मान्य करावा लागेल, असं काहीसं त्यांच्या मनात सुरू असावं. बीसीसीआयला मात्र आशा आहे की हा तमाशा आता संपेल. संघटनांतील पत्रव्यवहार, फॉलोअप आणि आठवणी या सगळय़ांच्या गदारोळात बीसीसीआयचे अधिकारी संयम राखून बसलेत. ‘ट्रॉफी लवकरच मुंबईच्या मुख्यालयात पोहोचेल,’ अशी आशावादी भूमिका त्यांनी घेतली आहे. पण जर ती आली नाही तर 4 नोव्हेंबरपासून दुबईत सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तिमाही बैठकीत हा मुद्दा अधिकृतरीत्या मांडण्यात येणार आहे. बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘एक महिना उलटून गेला तरी विजेतेपदाची ट्रॉफी आमच्याकडे आली नाही. आम्ही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत. दहा दिवसांपूर्वी आम्ही एसीसी अध्यक्षांना पत्र लिहिलं, पण त्यांच्या बाजूने अजूनही काही हालचाल नाही.





























































