क्रिकेटपटूंना जे आवडेल ते त्यांनी खावे! हलाल मांसावरून झालेल्या वादंगानंतर बीसीसीआयचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटपटूंसाठी हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तयार केलेला डाएट मेनू हा त्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय पथकाच्या सल्ल्याने तयार केला गेला आहे. एखादा पदार्थ खायलाच हवा अशी सक्ती बोर्डाने कुणावरही केलेली नाही. त्या सर्व अफवा आहेत. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना जे आवडेल ते त्यांनी खावे. मात्र आपली प्रकृती आणि फिटनेस कसोटी ठीक राखावा एवढीच आमची अपेक्षा आहे, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी केले. बीसीसीआयच्या कानपूरमधील जेवणाच्या मेनूत हलाल मांस समाविष्ट करण्याच्या निर्णयावर क्रिकेटशौकिनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आता बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बीसीसीआयने जेवणाचा डाएट मेनू कुणावरही लादलेला नाही असे सांगत कोषाध्यक्ष धुमल म्हणाले, बोर्डाने गुरुवारपासून कानपूरमध्ये सुरू होणाऱया न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा डाएट मेनू जाहीर केला आहे. त्यात खाण्याच्या पक्वान्नांचा स्पष्ट उल्लेख आहे. पोर्क अथवा बीफ मांसाहारात मिळणार नाही, पण चिकन अथवा मटण हलाल मांसापासून बनवले जाणार आहे. बोर्डाच्या वैद्यकीय तज्ञांनी हा मेनू ठरवला आहे. पण अमुकच एक पदार्थ खायला हवा अशी सक्ती कुणावरही केली जाणार नाही असे धुमल म्हणाले.

टीम इंडियाला आता खेळावर लक्ष देऊ दे!

टीम इंडियाच्या खाण्याच्या मेनूवरून झालेला वादंग कृपा करू थांबवा. कारण आता न्यूझीलंडसारख्या बलाढय़ संघाशी आपला मुकाबला आहे. खाण्यापेक्षा लढतीत विजय मिळवणे महत्त्वाचे आहे, असे कळकळीचे आवाहन बीसीसीआय कोषाध्यक्ष धुमल यांनी हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांना केले आहे. गेल्या एक-दोन वर्षांत किवीजच्या संघाने हिंदुस्थानी संघाला पराभवाचे झटके दिले आहेत त्याचे भान ठेवून आता वादंग नको असेही धुमल शेवटी म्हणाले.