बीसीसीआयची ‘आयपीएलघाई’ सुरू; आयपीएलचा साप्ताहिक ब्रेक 16 मे रोजी संपणार

हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएलचे रनयुद्ध आठवडाभर थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ‘बीसीसीआय’ने आता पुन्हा एकदा उर्वरित आयपीएलसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 16 मेपासून पुन्हा आयपीएलची ‘रन’घाई सुरू होणार आहे. तसेच उर्वरित 16 सामन्यांचा संग्रामही मे महिन्यात संपवण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखला जात असल्याचे समोर आले आहे, मात्र ‘बीसीसीआय’कडून अद्यापि याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लीगमध्ये 16 सामने बाकी…
आयपीएलचा उत्तरार्ध सुरू असतानाच ही स्पर्धा थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागला. बीसीसीआय आयपीएल पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ निश्चित करण्यापूर्वी केंद्र सरकारचे मत घेईल. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्या मते, आयपीएलचे वेळापत्रक तयार करण्यासाठी ‘बीसीसीआय’ची बैठक काही तासांतच होणार आहे. आयपीएलमध्ये सध्या 16 सामने शिल्लक आहेत, ज्यात चार प्ले ऑफ सामने आहेत. उर्वरित 16 सामने पूर्ण करण्यासाठी ते 12-14 दिवसांचा रोडमॅप तयार करत आहे. या वेळापत्रकात काही अतिरिक्त डबलहेडर्स जोडावे लागणार आहेत. जर बीसीसीआयला देशभरात लीग आयोजित करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली नाही तर उर्वरित सामने बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद या तीन दक्षिण हिंदुस्थानातील शहरांमध्ये होऊ शकतात. यामागील तर्क असा आहे की, ही शहरे पाकिस्तान सीमेपासून खूप दूर आहेत. पुन्हा तणाव वाढला तरी लीगवर परिणाम होता कामा नये, या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

या महिन्यातच आयपीएल संपविण्यासाठी हालचाली
दरवर्षी आयपीएलसाठी एप्रिल-मे ही विंडो उपलब्ध असते. याचा अर्थ असा की, या काळात जगात कुठेही कोणतीही मोठी मालिका होत नाही. जर आयपीएलचे उर्वरित सामने मे महिन्यात झाले नाहीत तर ‘बीसीसीआय’ला सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते. जूनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. यानंतर हिंदुस्थानी संघाला इंग्लंड दौऱयावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. उर्वरित संघदेखील ऑगस्टपर्यंत वेगवेगळय़ा मालिकांमध्ये व्यस्त असतील. त्यामुळे आयपीएलचा 18वा हंगाम मे महिन्यातच संपविण्यासाठी ‘बीसीसीआय’कडून रणनीती आणखी जात आहे. जर याच महिन्यात सर्व सामने खेळले गेले तर परदेशी गेलेले खेळाडू पुन्हा आयपीएलसाठी उपलब्ध होतील आणि दिग्गज खेळाडूंसह आयपीएलचा शेवट अपेक्षेप्रमाणे थरारक होईल.