बी पॉझिटिव्ह – सुख म्हणजे हेच असतं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमच्या सेटवर सगळ्यांकडूनच काही ना काही सकारात्मक मला शिकायला मिळाले आणि हो कुटुंबाला विसरून कसे चालेल… सांगतोय अभिनेता मंदार जाधव.

‘बी पॉझिटिव्ह’ या कॉलमविषयी जेव्हा मला विचारण्यात आले तेव्हा एका क्षणाचाही विचार न करता माझ्या डोळय़ांसमोर नाव आले ते चंद्रकांत कणसे यांचे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या आमच्या सीरियलचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे. आज जवळ जवळ तीन वर्षे काम करतो आहे मी त्यांच्या सोबत. अत्यंत प्रामाणिक, जिवाला जीव देणारा जिवलग, दूरदृष्टी असलेला दिग्दर्शक, संपूर्ण टीमच्या हातात हात घेऊन कसे पुढे जायला हवे याची अचूक जाण असलेला एक लीडर. हे आणि असे अनेक पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे. माझा मंदारपासून जयदीपपर्यंतचा प्रवास त्यांनी खूप जवळून पाहिला आहे आणि हा प्रवास दरवेळी कसा नवानवासा व हवाहवासा वाटण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. कारण ही भूमिका साचेबद्ध करायची नाही असे आम्ही आधीपासूनच ठरवलेले. जयदीप हा प्रत्येकाला आपलासा वाटेल इतपत त्यांनी ते पात्र सहज रंगवून दिले. त्यांचे व्हिजन फार भारी आहे.

माझ्या भूमिकेला वेगवेगळय़ा शेड्स आहेत. त्या उत्तम पद्धतीने मी दाखवू शकलो त्याचे श्रेय त्यांना जाते. संपूर्ण सीरियलचा डोलारा त्यांनी छान तोलून धरला आहे. त्यांचे एक वाक्य मला खूप आवडते ते वाक्य असे आहे… ते म्हणजे ‘आयुष्य सोपे आहे फक्त जगता आले पाहिजे’ खरेच एका वाक्यात त्यांनी जीवनाचे सार शिकवले आहे. मी आज सतरा वर्षे इंडस्ट्रीमध्ये आहे. हिंदी सृष्टीमध्ये मी पुष्कळ काम केले आहे. मला भेटलेल्या काही मोजक्या माणसांमध्ये ज्यांच्याशी माझे टय़ूनिंग जुळते त्यात चंद्रकांत कणसे हे नाव वरचे आहे आणि हो त्यांच्यासोबतच माधुरी देसाई हिला विसरून कसे चालेल? माधुरीविषयी मी काय बोलू? ‘कोठारे व्हिजन’ची प्रोजेक्ट हेड म्हणून कित्येक वर्षे काम करते आहे.

अत्यंत हुशार, अभ्यासू आणि शिस्तप्रिय असे व्यक्तिमत्त्व. तिचा आमच्या सेटवरचा वावर फारच रिफ्रेशिंग आणि पॉझिटिव्ह. शंभर नाही, हजार नाहीत अगणित हत्तींचे बळ घेऊन माधुरी नेहमी वावरत असते. दिवसातले 24 तास अपुरे पडतील की काय, अशा पद्धतीने तिचा कामाचा उरक असतो. तिची माझी वेव्हलेंथ पहिल्या भेटीतच जुळली. अत्यंत विश्वासाने आम्ही बऱयाच गोष्टी एकमेकांशी शेअर करतो. एक खात्री असते की, दोघांमधल्या दोघांमध्येच राहील. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या निमित्ताने मला माधुरी नावाची एक छान मैत्रीण मिळाली हे माझे मी भाग्य समजतो. तिच्याशी असलेल्या केमिस्ट्रीमुळे मी समोरच्याशी अत्यंत सहजतेने कसे वागता येईल, त्याला कसे खुलवता येईल, त्याच्याशी कसे बंध जुळू शकतील असे अनेक पैलू मी कळत नकळतपणे शिकत गेलो. कामाप्रति निष्ठा हवी, कामाचा उरक हवा, काम होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही, चिकाटीने व जिद्दीने आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचतच राहायचे अशा या आणि अशा असंख्य गोष्टी मी तिच्याकडून शिकत गेलो.

एक्सटेंडेड फॅमिली

आमच्या सेटवर साऱयांकडूनच काही ना काही सकारात्मक मला शिकायला मिळाले आणि आपण एक अधिक उत्तम अभिनेता व उत्तम माणूस कसे बनवू शकतो हेसुद्धा. दिवसातील बहुसंख्य वेळ आम्ही सेटवरतीच असतो. त्याच्यामुळे ती माझी ‘एक्सटेंडेड फॅमिली’ झाली आहे.

कुटुंबाची अनमोल साथ

सर्वात शेवटी कुटुंबाला विसरून कसे चालेल? माझे आई वडील, भाऊ, दोन मुले आणि माझी बायको मितिका यांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्णत्वाला जाणार नाही. माझे आयुष्य हे पॉझिटिव्हिटीने डवरलेले, बहरलेले झाड आहे. त्याच्या झाडाखालची माझे कुटुंब म्हणजे मूळ आहेत जी मला आज जमिनीशी घट्ट पकडून ठेवतात.

शब्दांकन : निनाद पाटील