
समोरच्या व्यक्तीला किंवा संधीला नाही म्हणणं आणि ही मला ‘आयुष्य’ नावाच्या युनिव्हर्सिटीतून मिळालेली शिकवण आहे…सांगत्येय अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे
तसं पाहिलं तर मी फार सावधपणे पाऊल टाकणारी, कुठल्याही गोष्टीवरती बारीक नजरेने सारासार विचार करून त्याचे फायदे- तोटे तपासून पाहणारी आहे. पुढचा मागचा विचार न करता कामात झोकून द्यायचं, काय होईल ते होईल बघू, असा निर्विकारपणा किंवा बिनधास्तपणा माझ्यात बिलकुल नव्हता, अगदी औषधालाही नव्हता.
पुढे पुण्यात कॉलेजमध्ये अनिल चरणजीत नावाचा मुलगा भेटला, जुजबी ओळख झाली आणि अगदी थोडय़ाच कालावधीत तो माझा जिवलग मित्र कधी झाला हे माझं मलाही कळलं नाही. अनिल हा बेफिकर नाही, पण बिनधास्त मुलगा. रिस्क घेणारा अर्थात, सारासार विचार करूनच. कारण त्याचा स्वतःच्या मनगटावरती प्रचंड विश्वास आहे. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर अत्यंत स्ट्रगलिंगच्या काळात अकाऊंटमध्ये तीन -पाच हजार रुपये असतील तरीही याच्या चेहऱ्यावरती करोडपती असल्याची भावना आणि आनंद जो त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर ओसंडून वाहायचा याच मला फार अप्रूप वाटायचं. नंतर मैत्री गडद झाल्यावर मला कळायला लागलं की, त्याच्या व्यावसायिक क्षेत्रातली एखादी गोष्ट म्हणजे त्याचा पोर्टफोलिओ म्हणा किंवा एखादा कॅमेरा हवा असेल त्याला फिल्म शूट करायला,
लॅपटॉपवरती काही सिनेमाचे काम असेल तर तो फार पुढचा मागचा विचार न करता ते पैसे इथून तिथून जमवायचा आणि ती गोष्ट घेऊन घरी यायचा, पण ती घेऊन आल्यावर मात्र जराही निवांत बसायचा नाही. दिवस-रात्र झपाटल्यासारखा ती वस्तू ज्या कारणासाठी घेतली त्या कारणाचा पाठपुरावा करायचा आणि त्या गुंतवणुकीतून अधिकाधिक कसे काम मिळेल, अधिकाधिक कसा फायदा होईल याचा केवळ विचारच नाही, तर कृती करायचा. हा विचार माझ्या मनाला पुष्कळ भावला. हळूहळू त्याच्या इतपत नाही, पण त्याच्या जवळपास थोडेफार जाईल अशी कॅल्क्युलेटेड रिस्क मी घ्यायला लागले. आयुष्यात प्रोफेशनली काम थोडे कमी-जास्त मिळाले तर हताश वगैरे होत नाही. स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या गुणवत्तेवरती विश्वास ठेवून सातत्याने काम शोधत राहते आणि मिळेपर्यंत स्वस्थ बसत नाही आणि काम मिळाल्यावर तर नाहीच नाही. अनिलमुळे मला ही एक महत्त्वाची गोष्ट कळली की, केवळ काठावरती बसून खोलीचा अंदाज येत नाही, त्यासाठी आपल्याला प्रवाहात सूर मारायला लागतो.
पुष्कळदा होतं काय आयुष्यामध्ये की, आपण जोखीम पत्करायला घ्यायला घाबरतो आणि नंतर मग ती गोष्ट करायला हवी होती, अशी चूटपुट हुरहुर राहून जाते आणि ती फार जीवघेणी असते. त्यापेक्षा कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन प्रयत्न केला, तर खूप सकारात्मक भावनेने यश निश्चितच मिळते. याची प्रचीती मला एकदा नाही, तर अनेकदा आली आणि याच बहुतांशी श्रेय मी अनिलला देते. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे समोरच्या व्यक्तीला किंवा संधीला नाही म्हणणे आणि ही मला ‘आयुष्य’ नावाच्या युनिव्हर्सिटीतून मिळालेली शिकवण आहे. वाचताना कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, अरे ‘नाही’ म्हणणे ही कुठली शिकवण? पण आयुष्यात आपल्याला अनेक संधी चालून येतात, पण जर आपल्या डोळय़ांत काही वेगळी स्वप्ने असतील वेगळी ध्येये असतील तर मग समोर आलेल्या त्या संधीला नाही म्हणणे, तो मोहाचा क्षण स्वतःवरती स्वार होऊ न देता त्या क्षणावरती आपण स्वार होणे आणि आपल्या ध्येयांकडे झेपावणे यात एक वेगळीच ग्रेस असते हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगू शकते.
स्वतःच्या गुणवत्तेवरती विश्वास ठेवला तर तुम्ही शब्दशः आकाशालासुद्धा गवसणी घालू शकता. फक्त एकच करायला हवे, कोणतीही भिडभाड न ठेवता जर आपल्याला एखादी गोष्ट मनापासून पटली, रुचली नसेल किंवा एखाद्या संधीसाठी काम करावे असे मनापासून वाटत नसेल तर नम्रपणे नकार द्यायला शिकायला हवे. काही काळाकरिता थांबून थोडे मागे आलो तर पुढच्या पावलाला एक नवीन संधी आपल्या स्वागतासाठी उभी असते.
रंगभूमीने केले प्रगल्भ
हिंदी इंडस्ट्रीत काम केल्यानंतर पुष्कळ संधी चालून आल्या, पण मला मराठी व्यावसायिक नाटकात काम करण्याची मनापासून इच्छा होती आणि गेल्या वर्षाच्या अखेरीस ती माझी इच्छा पूर्ण झाली. ‘सफरचंद’ नावाचं एक अप्रतिम नाटक माझ्या केवळ पदरात पडलं असं मी म्हणणार नाही तर ते माझ्या मनात, शरीरात, विचारात झिरपत गेलं. एक अभिनेत्री म्हणून मी किती प्रगल्भ झाले आणि काय देऊ शकते याची प्रचीती माझी मला आली आणि ती प्रचीती येता येता माझ्यासाठी एक आगळा आत्मविश्वाससुद्धा सोबत घेऊन आली.
शब्दांकन : निनाद पाटील

























































