
खरीप हंगामातील ज्वारी आणि बाजरी काढणीयोग्य होत असताना अतिरिक्त पावसामुळे दाणे काळे पडू लागले आहेत. शिवाय उत्पादनातही घट होणार आहे. गेली तीन वर्षे पाऊस झालाच नाही म्हणून शेतकऱयांचे नुकसान झाले, तर यंदा गरज नसताना पाऊस झाला त्यामुळे ज्वारी-बाजरीचे नुकसान होऊ लागले आहे. जास्त पाण्यामुळे कणसातील दाणे काळे पडू लागले आहेत. हाताशी आलेले पीक धोक्यात आल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
धुळे जिह्यातील 3 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रापैकी बहुसंख्य क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱयांची मदार खरीप हंगामावर असते. पावसाचा ताण सहन करणाऱया आणि कमी पावसात उत्पादन देणाऱया ज्वारी-बाजरीची शेतकऱयांकडून प्रामुख्याने पेरणी होते. यंदा अनेक शेतकऱयांनी ज्वारी-बाजरीची पेरणी केली. सुरुवातीच्या काळात पावसाने विलंब केला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. काही शेतकऱयांना दुबार पेरणी करावी लागली. नंतरच्या काळात बऱयापैकी पाऊस झाला. पिकांची वाढ जोमाने झाली. कणसात दाणेदेखील भरले. सर्वसाधारणपणे दसऱयाच्या काळात ज्वारी-बाजरीची काढणी होते. नवरात्रोत्सवाच्या काळात ज्वारी-बाजरीची काढणी झाल्यानंतर शेतकऱयांच्या हाती पैसा येतो. त्यामुळे दिवाळी मोठय़ा उत्साहात साजरी होईल. जिह्यातील बहुसंख्य क्षेत्रांमधील ज्वारी-बाजरीच्या काढणीची तयारी होत आहे, पण याच काळात पाऊस होत असल्याने ज्वारी-बाजरीचे नुकसान होत आहे. अतिरिक्त पाण्यामुळे दाणे काळे पडू लागले आहेत. साहजिकच उत्पादनात घट होत आहे. गेल्या वर्षी ज्वारी-बाजरीला एक हजार ते अकराशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल होता. यंदा मात्र हाच दर दुपटीच्या आसपास गेला आहे. अपेक्षित दरामुळे शेतकऱयांना भरपूर पैसे मिळतील असे वाटत होते, पण काढणीपूर्वीच दाणे काळे पडू लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
शेतकरी जात्यात तर व्यावसायिक सुपात
ज्वारी-बाजरीचे नुकसान झाल्याने त्याचा एकूणच परिणाम बाजारपेठेवर होईल. बहुसंख्य शेतकऱयांच्या हाती पैसा खुळखुळणार नाही. त्यामुळे त्याचा दिवाळीच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होणार आहे. आज शेतकरी अडचणीत तर उद्या व्यावसायिक अडचणीत येतील अशी स्थिती आहे.



























































