बीड : आदित्य कॉलेजमध्ये शेकडो पालक गॅसवर, व्हेरीफीकेशनऐवजी कॉलेजने प्रवेशद्वार बंद केले

सामना प्रतिनिधी । बीड

बीड- इयत्ता बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग डीफार्मसी आणि इतर डॉक्युमेंट व्हेरीफीकेशनसाठी सेंटर असलेल्या आदित्य इंजिनिअरींग कॉलेजमध्ये वेगळेच नाटक आज पालकांना पाहाण्यास मिळाले. शुक्रवार हा व्हेरीफीकेशसाठीचा अंतिम दिवस असताना गुरूवारी दिवसभर कॉलेज बंद ठेवण्यात आले. शेकडो पालक बाहेर उभे आहेत. कॉलेज प्रशासन काही सांगायला तयार नाही. संतप्त पालकांनी कॉलेज परिसरातच ठिय्या मांडला.

आदित्य इंजिनिअरींग कॉलेजमध्ये सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाचा फटका यापूर्वीही अनेकदा विद्यार्थ्यांना आणि पालकांना सहन करावा लागला आहे. अनियंत्रित कारभार असणाऱ्या या कॉलेजमध्ये कसा मनस्ताप सहन करावा लागतो. त्याचा प्रत्यय गुरूवारी शेकडो पालकांना आला. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग आणि डीफार्मसीसाठी लागणाऱ्या डाक्युमेंट्री व्हेरीफीकेशनसाठी आदित्य कॉलेज सेंटर आहे. सकाळपासूनच पालकांनी व्हेरीफीकेशनसाठी गर्दी केली. मात्र गुरूवारी सायंकाळपर्यंत कॉलेज प्रशासनाने कोणतेच पावले उचलली नाहीत. आज बंद असल्याचा बोर्ड लावण्यात आला. कॉलेज प्रशासन पालकांना काही सांगायला तयार नाही. बाहेर पालकांची घालमेल सुरू असताना प्रशासन मात्र मध्ये काही सूचनाही देण्यास तयार नाही. संतप्त पालकांनी कॉलेज परिसरातच ठिय्या मांडला आहे. विशेष म्हणजे व्हेरीफीकेशनसाठीचा अंतिम दिवस शुक्रवार असल्याने पालक चिंताग्रस्त आहेत.

संतप्त पालकांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव
गुरूवारी रात्रीचे साडेसात वाजले तरी आदित्य इंजिनिअरींग कॉलेजने डॉक्युमेंट व्हेरीफीकेशनसाठी प्रवेशद्वार उघडलेच नाही. पाल्यांच्या काळजीपोटी भांबावलेल्या पालकांनी संपूर्ण दिवस कॉलेज बाहेर काढला. अखेर संतप्त झालेल्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. दरम्यान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले.