बीडमध्ये काकांची कोंडी करण्यासाठी पुतण्याचा गट सरसावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर शुक्रवारी राजकीय मेळावा घेत आहेत. मोठे शक्तीप्रदर्शनही केले जाणार आहे. त्यांच्या ताब्यातील असणाऱ्या सहकारी संस्था, शिक्षण संस्था, बाजार समिती, नगर पालिका यातील कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करून मेळाव्यामध्ये सहभागी होण्याची तंबी दिली जात आहे. या मेळाव्यावर प्रशासनाने करडी नजर ठेवावी अशी मागणी संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये पाठींबा कोणाला द्यायचा यासाठी राष्ट्रवादीचे नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर 5 एप्रिलला बीडमध्ये समर्थकांची बैठक घेत आहेत. समर्थकांच्या या मेळाव्याला शक्तीचे स्वरूप यावे म्हणून नेहमीप्रमाणे क्षीरसागर बंधू आपल्या ताब्यात असणाऱ्या सहकारी संस्था, शिक्षण संस्था, नगर पालिका यातील कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करून त्यांचा उपयोग शक्ती प्रदर्शनासाठी करू शकतात. त्यांच्याकडून राजकीय वापर करून घेवू शकतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हा आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी मेळाव्याकडे करडी नजर ठेवावी अशी मागणी संदीप क्षीरसागर गटाचे नगरसेवक भैय्या मोरे आणि माणिक खांडे यांनी केली आहे.