
बीड शहराजवळ असणाऱ्या शासकीय गोडाऊन मध्ये धान्याचा मोठा अपहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आज जिल्हाधिकारी जातीने या मोहिमेवर दाखल झाले. सहा तास या गोडाऊनवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार तळ ठोकून होते या झाडाझडती मध्ये मोठा अपहार झाल्याचे समोर येत आहे. गुरुवारी रात्री तोंडी आदेश देऊन तेथील गोडाऊन किप्पर शिवशंकर मुंडे यांची उचलबांगडी करण्यात आली. तसेच दोन्ही गोडाऊनचा पदभार दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे देण्यात आला.
कोरोनाच्या संकटाने सामान्य माणूस हादरून गेला. हाताला काम नाही, खिशात पैसे नाही, उपासमारी होऊ नये म्हणून शेकडो मदतीचे हात पुढे येत असताना बीड मधील शासकीय धान्य गोडाऊनला घोटाळ्याचे उंदीर लागले आहेत. या गोडाऊनच्या गैरकारभाराच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वतः छापा टाकून सहा तासाची झाडाझडती घेतली.
पोत्याची तपासणी केली, तेथील वजन काटे तपासले या सर्व मोठा अपहार झाल्याचे समोर येत आहे. या सर्व प्रकरणाची पारदर्शक चौकशी केली जात आहे. सायंकाळी तातडीने येथील गोडाऊन किपर शिवशंकर मुंडे यांचा पदभार काढून घेत दोन्ही गोडाऊनचा कारभार दुसऱ्याकडे सोपवला आहे. जिल्हाधिकारी यांच्या कारवाईनंतर घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.
























































