दुष्काळग्रस्त धावला पुरग्रस्ताच्या मदतीला, बीड जिल्ह्याचा असाही माणुसकीचा झरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बीड

दहा वर्षात सात वर्षे दुष्काळात गेली. गेल्या तीन वर्षांपासून पदरी काहीच पडले नाही खायचे वांदे. पाण्याचे वांदे. उद्याची भ्रांत पण माणुसकीचा झरा मात्र कायम वाहत राहणारा बीड जिल्हा संकट झेलत, संकटाचे डोक्यावरचे ओझे खांद्यावर घेत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आला. वेदानाची जाणीव झळ सोसणाऱ्यांनाच असते. दुःखाचे चटके दुःख भोगलेल्यानाच समजू शकतात. आज संपूर्ण बीड जिल्हा एकवटला आहे. गावागावातून मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहेत. रोज खचाखच भरलेल्या ट्रक रवाना होत आहेत. ज्या शेतकऱ्याच्या घरात खायचे वांदे तो सुद्धा मदत देण्यासाठी पुढे येत आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले. दोन जिल्ह्यातील शेकडो गावे पाण्यात बुडाली गरीब असो की श्रीमंत संकटाचा सामना करत आहे. पुरग्रस्तांची परिस्थिती आणि त्याची अवस्था बघून उभा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिला. मात्र लक्ष वेधले ते बीड जिल्ह्याने आज बीड जिल्ह्यातील गावागावातून मदत फेरी काढली जात आहे प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे मदतीचा हात देत आहे. हजारो छोटे मोठे दुकानदार, व्यापारी जमेल ती मदत करत आहेत. शेकडो संस्था या मदतीच्या यज्ञात भर टाकत आहेत. दोन दिवसांपासून खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तू ने खचाखच भरलेल्या ट्रक सांगली कोल्हापूरकडे रवाना होत आहे. दान देताना या हाताची खबर त्या हाताला लागू नये त्याला सत्पात्री दान म्हणतात अगदी तसेच दहा पाच एकत्र येऊन मोठी मदत घेऊन पूरग्रस्त भागात रवाना होत आहेत.

संकटाच्या चटक्याच्या जाणीव बीड जिल्ह्यापेक्षा जास्त कोणाला असणार मागील दहा वर्षांत सात वर्ष होरपळून टाकणारा दुष्काळ सहन केला. ऑगस्ट मध्यावर आला अजूनही पाऊस नाही. नदी नाले कोरडेठाक. बीड जिल्ह्यातील सर्वच 144 प्रकल्पामध्ये नवा एक थेंब अजून आला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही टँकर वरच मदार. जनावरांचा चारा झाला नाही. पाच लाख हेक्टर वरील खरीप पिके उध्वस्त होत आहेत. सलग चार पाच वर्षे दुष्काळात गेली आता सुद्धा हाती काही लागणार नाही या भीतीने आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकरी कंगाल झाला आहे. बाजार पेठा ओस पडल्या आहेत. केवळ शेतकरीच नाही तर छोटे मोठे उद्योग धंदे घाईला आले आहेत. सगळ्यांना चिंता उद्याची अशी भीषण परिस्थिती असताना आपले संकट झुगारून पूरग्रस्त भावांच्या मदतीला बीड जिल्हा धावून जात आहे. कंगाल झालेला शेतकरीसुद्धा आपल्या घरात जे थोडेफार धान्य असेल त्यातील काही धान्य मदतीच्या यज्ञात टाकत आहे. मदतीचा हा आधार माणुसकी जपणारा आहे हे नक्की.