
बीड लोकसभा अन विधानसभा निवडणुकीत निवडणूक निधीत वाढीव अन बोगस बिले दाखवून झालेल्या कोट्यावधीच्या घोटाळा प्रकरणाची दुसऱ्यानंदा चौकशी करण्यासाठी समिती सज्ज झाली आहे. गुरुवारी सकाळी सहा सदस्यीय समिती बीड मध्ये दाखल होत आहे. निदान आता तरी पारदर्शक चौकशी केली जावी ही माफक अपेक्षा जिल्हावासीयांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा अन विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक प्रक्रिया साठी आलेला निधी फस्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुत्तेदाराशी संगनमत करून प्रत्येक लहान सहान वस्तूच्या खरेदीत अव्वा च्या सव्वा बिले जोडून निधी उडवल. मंडपाच्या बिलात तर कहर केला होता, प्रशिक्षणासाठी देण्यात आलेल्या मंडपाचे भाडे होते नऊ कोटी रुपये एवढेच काय इतर वस्तूच्या खरेदीत अन भाड्यात ही कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचे काम ‘दैनिक सामना’ने केले. सामनाच्या पाठपुराव्या नंतर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले. मात्र समितीने घोटाळेबाजाना पाठीशी घालण्याचे काम केले होते. थातूर मातूर चौकशी करून अहवाल सादर केला. हा अहवाल पारदर्शक नाही चौकशी चुकीची झाली, अशी तक्रार झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी जुना अहवाल फेटाळून नव्याने चौकशीचे आदेश देत सहा सदस्यीय समिती नेमली. 17 मार्च पर्यंत या समितीला अहवाल सादर करण्याची डेड लाईन दिली आहे, त्या अनुषगाने ही समिती गुरुवारी बीड मध्ये दाखल होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ही समिती चौकशी करणार आहे.






























































