सध्या माझे दिवसच फिरलेत…इंदुरीकर महाराजांची खंत

1510

समाजात चांगलं वागणाऱयाला त्रास होतो, हे पूर्वीपासूनच चालत आले आहे. माझ्या बाबतीतही सध्या असंच घडत आहे, हे दुर्दैव असून माझेही सध्या वाईट दिवस आहेत. चांगलं काम करताना एवढा त्रास होत असल्याची खंत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केली.

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे आष्टी तालुक्यातील कुंभारवाडीमध्ये रविवारी दुपारी कीर्तन होते. या कीर्तनाला गावात येताना इंदुरीकर महाराजांचे गावकऱयांनी जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे ‘आय सपोर्ट इंदुरीकर’, ‘आमचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा’ असे फलक घेतलेले लोक या कीर्तनामध्ये सहभागी झाले होते. गेल्या आठवडय़ामध्ये ‘सम तारखेस मुलगा, तर विषम तारखेस मुलगी जन्मास येते’, अशा वक्तव्यावरून इंदुरीकर महाराज वादात सापडले आहेत. त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले. प्रशासनाच्या वतीने त्यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. अनेक संघटनांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीसुद्धा केलेली होती. त्यानंतर प्रथमच ते बीड जिह्यात आले होते.

आंदोलने करू नका!

मुलगा-मुलगीच्या जन्माबाबत वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेले लोकप्रिय कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ आता लोक पुढे येऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी आंदोलने करण्याची चाहत्यांची तयारी सुरू आहे. मात्र, खुद्द इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना त्यापासून रोखले आहे. आपल्यासाठी कोणीही मोर्चे, आंदोलने करू नये; शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे. ‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते,’ असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनात केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या