बीडमध्ये भरदिवसा थरार… आधी गोळ्या झाडल्या मग चाकूने भोसकले; तरुणाची निर्घृण हत्या

फुटलेली पाईपलाईन दुरूस्त करणार्‍या एका तरूणावर अज्ञात तरूणाने गोळीबार करत दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्यानंतरही तो तरुण जिवंत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी पुन्हा चाकूने भोसकून त्याची हत्या केली. या हल्ल्यानंतर तो जागीच ठार झाला. ही भयंकर घटना बीड शहरातील अंकुशनगर भागामध्ये घडली. या थरारक घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

बीड नगर पालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेला हर्षद शिंदे हा कर्मचारी अंकुशनगर भागामधील साई पंढरी लॉन्ससमोर फुटलेली पाईपलाईन दुरूस्तीचे काम करत होता. तो कामामध्ये मग्न असताना अज्ञात मारेकर्‍याने हर्षदच्या दिशेने गोळीबार करत दोन गोळ्या झाडल्या. यात हर्षद शिंदे जखमी झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर जखमी अवस्थेत स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धडपडणार्‍या हर्षदचा मारेकर्‍याने पाठलाग करत धारदार चाकूने त्याला भोसकले. यात हर्षद शिंदे जागीच ठार झाला. ही खळबळजनक घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बीड शहरामध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली.