खून प्रकरणात जामिनावर सुटलेल्या व्यक्तीस बेदम मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खून प्रकरणात जामिनावर सुटून आलेल्या व्यक्तीला काठीने लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना निलंगा तालुक्यातील येळनुर येथे घडली. या मारहाणीप्रकरणी विक्रम करण सोळुंके याने तक्रार दाखल केली. आकाश अनिल साळुंके यांच्या वडिलांच्या खून प्रकरणात त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटून तो गावी आलेला होता.

कृषी विभागाचे कर्मचारी गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी घेऊन आले होते. त्यांनी आधार कार्ड घेऊन येण्यास सांगितल्यामुळे फिर्यादी विक्रम हा घरी जाऊन आधार कार्ड घेऊन गावातील मारुती मंदिर जवळ आला. तिथे आकाश अनिल साळुंखे आणि त्याचे काही मित्रही होते. विक्रमला पाहताच आकाश संतापला व त्याने त्याला शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने काठीने मारहाण केली.

तसेच एखाद्याला खल्लास केल्याशिवाय माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती वाटणार नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.