
बीड जिल्ह्यात 6 नगरपालिकेसाठी मतदान झाले. न्यायालयाच्या निकालामुळे मतमोजणीला विलंब लागला. तोपर्यंत मतदान यंत्रांना स्ट्राँग रूममध्ये विसावा देण्यात आला. स्ट्राँग रूमच्या बाहेर पोलिसांच्या तुकड्यांचा कडक बंदोबस्त तैनात, सीसीटीव्हीची नजरही स्ट्राँगरूमभोवती तरीही स्ट्राँग रूमच्या बाहेर कडाक्याच्या थंडीमध्ये 24 तास कार्यकर्त्यांचा खडा पहारा दिसत आहे. कार्यकर्त्यांचा आता ना सरकारवर विश्वास, ना यंत्रणेवर, म्हणूनच जीव धोक्यात घालून आळीपाळीने डोळ्यात तेल घालून कार्यकर्ते स्ट्राँग रूमबाहेर ठाण मांडून आहेत.
बीड जिल्ह्यातील बीड शहरासह परळी, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, गेवराई हा सहा नगरपालिकेसाठी मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले. लगेच निकाल म्हणून उमेदवारांमध्येही उत्साहाचे आणि थोडेफार तणावाचे वातावरण असतानाच न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे निकाल तब्बल १९ दिवस लांबणीवर पडला. १९ दिवसांसाठी मतदान यंत्राची रवानगी ठिकठिकाणच्या स्ट्राँग रूममध्ये करण्यात आली. मतदान यंत्रणे सांभाळणे जिकरीचे असताना स्ट्राँग रूमभोवती सीसीटीव्हीची करडी नजर ठेवण्यात आली. स्ट्राँग रूम परिसरात जामर बसवण्यात आले. एवढेच नाही तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
एवढी सुरक्षा असतानाही उमेदवार आणि उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदान यंत्रांची देखरेख रामभरोसे राहू नये म्हणून काळजी घ्यायला सुरूवात केली. सकाळी 7 वाजल्यापासून दुसर्या दिवशी 7 वाजेपर्यंत त्या स्ट्राँग रूमच्या बाहेर कार्यकर्त्यांचा खडा पहारा सुरू झाला. अगदी कडाक्याच्या थंडीत रात्रभरही कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत.
शासकीय सुरक्षा असताना प्रत्येक जण आपल्या मतदान यंत्राची काळजी का घेत आहे असा प्रश्न उपस्थित केला गेल्यावर आमचा कोणावरही विश्वास नाही, मतमोजणी होईपर्यंत कधी काय होईल याची भीती असल्यामुळे आम्ही आमच्या सुरक्षेची काळजी न घेता मतदान यंत्राच्या सुरक्षेची काळजी घेत असल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
बीड नगर पालिकेचे मतदान यंत्र शहरापासून सात कि.मी.अंतरावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली. शहराबाहेर स्थिरावलेल्या मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सक्षम असतानाही कार्यकर्त्यांचा दिवसरात्र जागता पहारा आहे. हा पहारा हेच दर्शवितो की, ना शासनावर विश्वास, ना यंत्रणेवर.





























































