जातीयवादी राक्षसाचा नायनाट करणार, भगवानगडावरून पंकजा मुंडेंचा संकल्प

नवरात्रामध्ये नऊ दिवस त्या दुर्गेची पूजा केली, उपवास केले, त्या दुर्गेने रक्तबिजासारख्या राक्षसाला संपवून टाकले होते. जातीयवादाचे, धर्मवादाचे हे राक्षस संपवण्याची ताकद आम्हाला दे, हीच मागणी मी त्या दुर्गेकडे करते आहे, असे पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरून दसरा मेळाव्यात बोलताना म्हटले.

सावरगावघाट या भगवान भक्तीगडावर राष्ट्रसंत भगवानबाबांच्या जन्मगावी आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, भविष्यात आपण जाती जातीत गुंफण्याचा धागा होऊ हीच बाबांची शिकवण आहे मराठा आरक्षणाला स्व. गोपीनाथ मुंडेंनी समर्थन दिले होते. मीही मराठा आरक्षणासाठी समर्थन दिले आहे. आमची मागणी एवढीच आहे की, आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका. असे सांगत जातीयवादाच्या विरोधात लढण्याचा संकल्प पंकजा यांनी केला.या वेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे, आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर आदी उपस्थित होते.

मेळाव्यात झळकले वाल्मीक कराडचे फोटो

भगवान भक्तीगडावर प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. समर्थकांच्या हातात असंख्य बॅनर होते. काहींच्या हातांमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबांचे व स्व. गोपीनाथ मुंडेंचे बॅनर झळकत होते, तर काहींच्या हातांमध्ये स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा मास्टरमाइंड असणाऱ्या वाल्मीक कराड याचे बॅनर या मेळाव्यामध्ये झळकले.