
लॉकडाऊनमध्ये बीयर शॉपी उघडण्यास शासनाने सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, दारू खरेदीसाठी नागरिकांकडून ठिकठिकाणच्या बीयर शॉपसमोर गर्दी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सर्व बीयर शॉपी मालकांना नोटीस देऊन सोशल डिस्टन्स पाळण्याची सूचना केली आहे. त्यानंतरही दारू दुकानासमोर गर्दी झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला आहे.
सोशल डिस्टन्स पाळणे प्रत्येकाचे कर्तव्य असून नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी बीयर शॉपी मालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दररोज दारू विक्री करण्यासाठी टोकन सिस्टीम राबविण्यात यावी अशी सूचना संबंधित दुकानदारांना करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरही बीयर शॉपी समोर गर्दी झाल्यास संबंधित बीयर शॉपी मालक आणि ग्राहकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
दारू खरेदीसाठी वाहनांना पास आवश्यक
दारू खरेदीसाठी बाहेर पडण्याऱ्या नागरिकांनी वाहनाचे पास काढणे आवश्यक आहे. पासशिवाय वाहन रस्त्यावर चालवू नये. अन्यथा कारवाई केली जाणार आहे. तसेच इमारतीच्या बांधकामासाठी एक एकट्याने प्रवास करू नये. कामाच्या ठिकाणी मजूर नेण्यासाठी ठेकेदाराने एकाच वाहनातून जास्तीत जास्त कामगार नेण्याची सोय करावी, असे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
























































