उद्यापासून हॉटेल, बार, रेस्टॉरंटची ‘अग्नि’परीक्षा; थर्टी फर्स्टआधी पालिका सतर्क

आगामी थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या पाटर्य़ांच्या पार्श्वभूमीवर पालिका सतर्क झाली असून 22 डिसेंबरपासून 28 डिसेंबरपर्यंत हॉटेल, बार, रेस्टॉरंट, इमारती, सोसायटय़ांमधील अग्निसुरक्षेची झाडाझडती घेण्यात येणार आहे. या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसल्यास नोटीस बजावून आवश्यक सुविधा सक्षम करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात येणार आहे.

गोव्यामध्ये एका नाईट क्लबला लागलेल्या आगीत पाच पर्यटकांसह 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने मुंबईतील सर्वच उपाहारगृहे, बार, रेस्टॉरंट, हॉटेल्सच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने नियमित तपासणी कार्यवाहीदेखील सुरू ठेवली आहेत. तर आता 22 ते 28 डिसेंबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवणार आहे. या तपासणीत अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 च्या तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये वीज, पाणी कापणे, सील करणे अशी कारवाई होऊ शकते, असेही अग्निशमन दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चौपाटय़ांवर सुरक्षा टाईट

नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुरक्षाविषयक उपाययोजना म्हणून गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा, गोराई अशा चौपाटय़ांवरदेखील जीवरक्षक, बोटी व जीवसंरक्षक साधने यासह मनुष्यबळ तैनात करण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच मुंबईकर-पर्यटकांनीदेखील उत्साहाच्या भरात बेजबाबदारपणे वागू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.