बेळगाव महापालिकेवर कोणाची सत्ता? आज होणार मतमोजणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन वर्षांपूर्वी कर्नाटक सरकारकडून बरखास्त करण्यात आलेल्या आणि तब्बल आठ वर्षांनी होत असलेल्या बेळगाव महापालिकेवर कोणाची सत्ता येणार, याचा निकाल उद्या (दि. 6) लागणार आहे. शुक्रवारी अवघे 50.41 टक्के मतदान झाले होते. आतापर्यंत मराठी भाषिकांनी सत्ता राखण्यात यश मिळविले होते. यंदा प्रथमच भाजप, काँग्रेससह आप अशा राष्ट्रीय पक्षांनीही उमेदवार उभे करून तगडे आव्हान निर्माण केले आहे. मतदानाची घसरलेली टक्केवारी, मतदारयादीतील घोळाचा फटका कोणाला बसणार, हे या निकालातून स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढय़ात मराठी भाषिक चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अत्यंत चुरशीने 50.41 टक्के मतदान झाले. 58 प्रभागांसाठी तब्बल 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य अजमावीत आहेत. एक लाख 13 हजार 396 पुरुष, एक लाख तीन हजार 764 महिला अशा एकूण दोन लाख 17 हजार 160 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. कानडी प्रशासनाची दडपशाही झुगारून गल्लोगल्ली घरांवर भगवे ध्वज फडकवून मराठी भाषिकांनी मतदान करून लक्ष वेधले होते.

तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंडय़ाखाली मराठी भाषिक पुन्हा एकदा एकवटले असून, समितीकडून 23 मराठी भाषिक उमेदवार अधिकृत घोषित केले आहेत. तर, अन्य प्रभागांत मराठी भाषिक उमेदवारांना निवडणूक लढविण्याची मुभा समितीकडून देण्यात आली आहे. राष्ट्रीय पक्षांनी पहिल्यांदाच पक्षाच्या चिन्हावर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे पुन्हा बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकांचीच सत्ता येणार काय, याकडे संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बहुमत कोण मिळविणार… कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या

यापूर्वी 2013 साली निवडणूक झाली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीने सत्तेची 27ची ‘मॅजिक फिगर’ गाठली होती. मराठी भाषिक नगरसेवकांची संख्या 30च्या पुढे ठेवण्यात मराठी भाषिकांना यश आले होते. त्यामुळेच बेळगाव महापालिकेत मराठी महापौर होता. आता या निवडणुकीत पुन्हा मराठी भाषिकांच्या हाती सत्ता येणार, यासह कोण निवडून येणार, यावरून सर्वत्र पैजाही लागल्याने अंतिम निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.