कन्नडिगांची टरकली, शिवसेनेचे फलक असलेली वाहने जप्त करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

शीतल धनवडे

सीमाभागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नेहमीच धावून येणाऱ्या शिवसेनेला कानडी पोलिसांच्या संरक्षणात टार्गेट करण्याच्या प्रयत्नात आता कन्नड रक्षण वेदिकेची चांगलीच टरकल्याचे दिसून येऊ लागले आहे. बेळगावातील शिवसेना कार्यालय बंद करा, तसेच शिवसेनेचे फलक असलेली वाहने जप्त करा, अशी केविलवाणी आणि हास्यास्पद मागणी बेळगाव जिल्हा कन्नड संघटना क्रिया समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

महिना-दोन महिन्यांपूर्वी बेळगाव महापलिकेसमोर अनधिकृत लाल-पिवळा ध्वज लावल्यापासून कन्नड संघटनांकडून मराठी भाषिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी दररोज काहीतरी कुरापत काढण्यात येत आहेत. त्यात सीमाप्रश्नी मराठी भाषिकांसाठी नेहमीच आक्रमक असलेल्या शिवसेनेलाच टार्गेट करण्याचा प्रयत्न आता ‘करवे’कडून करण्यात येऊ लागला आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या बेळगाव जिल्हाप्रमुखांच्या वाहनांवर पोलीस बंदोबस्त असतानाही ‘करवे’च्या गुंडांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. कोल्हापुरातील शिवसैनिकांनी, तर थेट कोगनोळी टोलनाक्यावर धडक देत कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टिकर चिकटवून परत पाठवले. महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या कर्नाटक परिवहनची बससेवाही गेल्या तीन-चार दिवसांपासून बंद पाडली आहे. सोशल मीडियातून व्यक्त होणाऱ्या मराठी भाषिक तरुणांवर गुन्हे दाखल करून अमानुष मारहाण करण्यात आली. मराठी फलकांवर काळे फासून विटंबना करण्यात आली. तरीसुद्धा मराठी भाषिक बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज हटविण्याच्या भूमिकेवर आजही ठाम आहेत.

त्यामुळे सीमाप्रश्नी मराठी भाषिकांसाठी नेहमीच आक्रमक असलेल्या शिवसेनेलाच टार्गेट करण्याचा प्रयत्न आता ‘करवे’कडून करण्यात येऊ लागला आहे. याचाच भाग म्हणून बेळगाव जिल्हा कन्नड संघटना क्रिया समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, बेळगावमधील शिवसेना कार्यालय बंद करण्यासह वाहनावर शिवसेना म्हणून फलक असलेली वाहने जप्त करण्याची मागणी केली आहे.