
कोरोना संसर्ग कायद्याचा बडगा दाखवत मूक सायकल फेरीस परवानगी नाकारली, पोलीस बळाचा वापर करून एकत्र येण्यास अनेक अडथळे केले. तरीही कानडी प्रशासनाची दडपशाही झुगारत आज सीमाभागात मराठी भाषकांनी कर्नाटक सरकार विरोधात सुतक व काळा दिवस यशस्वी केला. बेळगाव येथील मराठा मंदिरात एक दिवसाचे सत्याग्रह आंदोलन करून केंद्र आणि कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. कितीही दडपशाही करा… अडथळे आणा… अत्याचार करा… पण आम्ही महाराष्ट्रात जाणारच असा एकमुखी निर्धार यावेळी करण्यात आला. ‘बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ अशा घोषणांनी संपूर्ण सीमाभाग दणाणून गेला होता.
भाषावार प्रांतरचनेत जबरदस्तीने कर्नाटक राज्यात घुसडल्याच्या निषेधार्थ दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्य स्थापनादिनी सीमाभागात मराठी भाषकांकडून सुतक व काळा दिवस पाळला जातो. मराठी भाषकांचा आवाज चिरडण्याचा दरवर्षी प्रयत्न कानडी प्रशासनाकडून केला जातो. यंदा कर्नाटक राज्यात सर्व गर्दीचे कार्यक्रम सुरू असताना कोरोनाच्या नावाखाली कायदेशीर कारवाईचा फतवा काढून आजची मूक सायकल फेरी रद्द करण्यास मराठी भाषकांना भाग पाडण्यात आले. दरवर्षी या मूक सायकल फेरीचा समारोप मराठा मंदिर येथे सभेने होतो. यावेळी ठराव मांडले जातात, पण यंदा सायकल फेरी रद्द केली असली तरी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत सत्याग्रह आंदोलन करून सीमावासीयांच्या भावना लोकशाही मार्गाने मांडण्यात येणार होत्या. यालाही परवानगी नाकारून हे आंदोलन खंडित करण्याचे षडयंत्र कर्नाटक प्रशासनाकडून रचले गेले.
कर्नाटक सरकारने लोकशाहीचा सन्मान करावा
कर्नाटक राज्यात सध्या गर्दीचे सर्व कार्यक्रम होत आहेत. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनालाच बंदी घालण्यात येत आहे. कोरोनाचे कारण देत मूक सायकल फेरीला बंदी घातली. तुमचा आदेश आम्ही पाळला. मग एका ठिकाणी एकत्र येऊन आजपर्यंत मराठी भाषकांवर होत असलेल्या अत्याचाराचा लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा राज्यघटनेने दिलेला हक्क का नाकारला जात आहे? आजच्या सत्याग्रह आंदोलनाला येण्यासाठी कानडी पोलिसांनी अनेक अडथळे निर्माण करून दडपशाहीचा प्रयत्न केला. मराठा मंदिर परिसराचे वातावरण तर ओपन तुरुंगाप्रमाणे केले. मात्र, गनिमी कावा हा मराठी माणसांना शिकवावा लागत नाही. हे आज पुन्हा एकदा दिसून आले. त्यामुळे कितीही अत्याचार, अन्याय करा, अडथळे आणा मराठी भाषक मागे हटणार नाही, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिला.
अडवणुकीसाठी मराठी भाषकांच्या घरांसमोर पोलीस बंदोबस्त
- मध्यरात्रीपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी बाहेर पडू नयेत यासाठी त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मराठा मंदिर परिसरात बॅरिकेड्स लावून, मराठी भाषकांना अडथळे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीसुद्धा कर्नाटक प्रशासनाची ही दडपशाही मोडून मराठी भाषक मराठा मंदिरात एकत्र आले. सभागृहात अनेक आंदोलकांनी हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून ढोल बडविणाऱया भाजपवर निशाणा साधला. सीमाभागात भगवा ध्वज फडकवू शकत नसल्याचे सांगत भाजपचे नाव न घेता वाभाडेच काढले.
- सीमाभागात मराठी भाषकांवरील अन्यायाच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनेही काळा दिन पाळण्यात आला. ऐतिहासिक मिरजकर तिकटी येथील हुतात्मा स्तंभासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, मंजित माने, शुभांगी पवार, स्मिता सावंत आदी उपस्थित होते.


























































