
सह्याद्री व्याघ्र राखीवच्या संरक्षण क्षमतेत भर घालत, ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे प्रशिक्षित स्निफर डॉग बेल्जी आजपासून अधिकृतपणे सेवेत दाखल झाले आहेत. 28 आठवडय़ांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून बेल्जी व त्याची मुख्य हँडलर सारिका जाधव यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला. सहायक डॉग हँडलर म्हणून अनिल कुंभार यांनीही या मोहिमेत योगदान दिले.
या श्वानाला ट्रफिक इंडिया या वनस्पती-वन्यजीव व्यापारावर देखरेख करणाऱया अग्रगण्य अशासकीय संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आले. भारतातील आघाडीची राष्ट्रीय कुत्र्यांसाठी प्रशिक्षण केंद्र (एनटीसीडी), इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दल, पंचकुला (हरयाणा) येथे 26 जानेवारी 2025 पासून 8 राज्यांतील 14 श्वानांचे प्रशिक्षण झाले. प्रशिक्षणातील प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत सारिका जाधव, बेल्जी यांनी सर्वांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला.
बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वान उच्च बुद्धिमत्ता, चपळता व तीव्र वास घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. शिकारविरोधी कारवाई, अवैध वृक्षतोड, संरक्षित प्राण्यांची तस्करी, ड्रग्ज व स्फोटके शोधणे, अशा विविध मोहिमांत ही जात अत्यंत परिणामकारक ठरते. बेल्जीची तैनाती झाल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील शिकारविरोधी मोहिमा, अवैध वन्यजीव व्यापारावरील कारवाई आणि तपासकार्य अधिक सक्षम होणार आहे, असे सह्याद्री व्याघ्र राखीवचे संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले.