4 कोटी लोकांना दारिद्रय़रेषेखाली टाकले, बिल ऍण्ड मेलिंडा गेटस् फाऊंडेशनचा अहवाल

231

कोरोनामुळे जगातील सुमारे चार कोटी नागरिक दारिद्रय़रेषेखाली गेले. फक्त 25 आठवडय़ांमध्ये जगाची 25 वर्षे पिछेहाट झाली असा अहवाल बिल ऍण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने दिला आहे. कोरोना संकटाचा आरोग्य क्षेत्रालाही जबर फटका बसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

कोरोनाने जगातील बहुतांश देशांचे नुकसान केले आहे. या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला 12 अब्ज डॉलर्स इतका आर्थिक फटका बसला आहे. इतकेच नक्हे तर याचा परिणाम संयुक्त राष्ट्राच्या गरीबी निर्मुलनाच्या कार्यक्रमावरही झाला आहे असे या अहवालात म्हटले आहे.

कोरोनामुळे जगातील गरीबी सात टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये झालेल्या विकासावर त्याचा परिणाम झाला आहे. आधीच दारिद्रय़रेषेखाली असलेल्या नागरिकांवर त्याचा अधिकच परिणाम जाणवत आहे असे या अहवालात म्हटले आहे.

कोविड-19 चे दुष्परिणामांना पुरुषांपेक्षा महिलांना अधिक सामोरे जावे लागणार आहे. विशेषत: गर्भवती स्त्रियांना त्याचा त्रास होऊ शकतो. प्रसूतीपूर्व, प्रसूतीवेळी आणि प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यास सद्यस्थितीत आरोग्य यंत्रणा अपुरी पडण्याची शक्यता आहे अशी भीती या अहवालात व्यक्त केली गेली आहे.

कोरोनाने 20 वर्षांतील प्रगतीला घातली खीळ

कोरोनाच्या महामारीमुळे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांना साध्य करण्याच्या गेल्या 20 वर्षांतील प्रगतीला खीळ घातल्याचे फाऊंडेशनने त्यांच्या चौथ्या वार्षिक गोलकीपर्स अहवालात म्हटले आहे. जागतिक ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने होत असलेल्या प्रगतीवर या महामारीचा कशाप्रकारे परिणाम झाला आहे हे दर्शवणारी आकडेवारी फाऊंडेशनने नुकतीच जाहीर केली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल लोकांचे प्रमाण 7 टक्क्यांनी वाढले आहे. तसेच आरोग्य यंत्रणांच्या कार्य पद्धतीचे प्रमाण 1990 साली होते तेच आता आहे. म्हणजेच 25 आठवडय़ात जग 25 वर्षे मागे गेले आहे, असे अहवालात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या