
इंग्लंडचा संकटमोचक, स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला अखेर गुडबाय करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी तो अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. क्रिकेट खेळाची जननी असलेल्या इंग्लंडचे एकदिवसीय क्रिकेटमधील जगज्जेते पदाचे स्वप्न पूर्ण करणाऱया बेन स्टोक्सची किताबी लढतीतील संस्मरणीय खेळी कायम स्मरणात राहणारी आहे.
31 वर्षीय बेन स्टोक्सने 2011मध्ये आयर्लंडडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले हेते. आतापर्यंत 104 एकदिवसीय सामने खेळणाऱया स्टोक्सने 2919 धावा फटकाविल्या असून 74 बळीही टिपले आहेत. 2019च्या विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्सवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम लढतीत बेन स्टोक्सने 84 धावांची खेळी साकारून इंग्लंडला विजेते पद पटकावून दिले होते. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असलो तरी टी-20 आणि कसोटी क्रिकेटसाठी मी सज्ज आहे, असेही बेन स्टोक्सने सांगितले.
नव्या खेळाडूने माझ्याहून सरस कामगिरी करावी!
‘‘डरहॅममध्ये मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मी अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय सोपा नव्हता. मात्र आता क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे कठीण असल्याचं माझं शरीर मला सांगतंय. नव्या दमाच्या खेळाडूची जागा अडवून बसणं योग्य नाही. माझ्या जागेवर येणाऱया नव्या खेळाडूने माझ्याहून सरस कामगिरी करावी असेच मनस्वी वाटतेय.’’
– बेन स्टोक्स




























































