मिठी नदीत बेनेट रिबेलोच्या पायाचा भाग सापडला

564

बेनेट रिबेलो याची हत्या करून मग त्याच्या शरीराचे तुकडे ज्या सुटकेसमध्ये भरून फेकले होते अशा दोन सुटकेस सापडल्यानंतर  बुधवारी मिठी नदीत बेनेटच्या पायाचा एक भाग पिशवीत गुंडाळून फेकलेला सापडला. अजूनही बेनेटचा धडापासून डोक्यापर्यंतचा भाग सापडलेला नाही.

माहीम समुद्रकिनारी सापडलेल्या सुटकेसमध्ये बेनेटचा एक हात, एक पाय आणि गुप्तांग सापडले होते. त्यानंतर मंगळवारी सापडलेल्या दुसऱया सुटकेसमध्ये दुसरा पाय आणि हात सापडला होता, तर बुधवारी मिठी नदीत एका काळ्या पिशवीत गुंडाळून फेकलेला मांडीचा भाग मिळाला. आता पोलीस बेनेटचा धडापासून डोक्यापर्यंतचा भाग शोधत आहेत.

त्या रिक्षाचालकाचा शोध सुरू

बेनेटची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर रिया आणि तिच्या अल्पवयीन प्रियकराने ते तुकडे बॅगांमध्ये भरले आणि मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षातून मिठी नदीपर्यंत नेऊन ते नदीत फेकले होते. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टिकोनातून तो रिक्षाचालक प्रमुख साक्षीदार आहे. म्हणून पोलीस त्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. त्यासाठी पोलिसांनी खबऱयांना कामाला लावले असून रिक्षा संघटनांची मदत घेत आहेत.

सीसीटीव्ही कुचकामी

राज्य सरकारने मुंबईत सीसीटीव्हीचे जाळे पसरवले आहे परंतु त्या सीसीटीव्ही फुटेजचा दर्जा इतका खराब आहे की कॅमेऱयांनी लांबून घेतलेल्या त्या फुटेजमध्ये गाडय़ांचा नंबर स्पष्ट दिसत नाही. दुचाकीस्वाराचा चेहरादेखील धूसर दिसतो. त्यामुळे रस्त्यावर लावलेले सीसीटीव्ही पोलिसांसाठी डोकेदुखीच ठरू लागले आहेत. त्या तुलनेत नवी मुंबई पोलिसांनी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयांचा दर्जा जबरदस्त असून त्यात गाडीचा नंबरदेखील स्पष्ट दिसतो.

आपली प्रतिक्रिया द्या