
>> नमिता वारणकर
बंगाली संस्कृतीची मूळं त्यांच्या साहित्य, संगीत आणि सिनेमामध्ये लपलेली आहेत. यामध्ये सिनेमांचा विचार केला, तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बंगाली कलाकार, गायक, संगीतकार आणि दिग्दर्शकांचे भरीव योगदान आहे. बिमल रॉय, फणी मजुमदार, अमिया चक्रवर्ती, सत्येन चक्रवर्ती, सत्येन बोस, सुधेंदु रॉय, सत्यजित राय, मृणाल सेन, ह्रषिकेश मुखर्जी, शक्ति समंता, बासू चॅटर्जी, दुलाल गुहा, प्रदीप सरकार, गौतम घोष, तपन सिन्हा, अनुराग बासु, अयान मुखर्जी अशी बरीच नावे घेता येतील. असे एकापेक्षा एक उत्कृष्ट बंगाली दिग्दर्शक हिंदी सिनेसृष्टीला लाभले.
चित्रपटाच्या विविध पैलुंवर विलक्षण प्रभुत्व असणाऱ्या, भावभावनांचे विविध रंग सिनेमामध्ये भरणाऱ्या या दिग्दर्शकांच्या मनोरंजनात्मक प्रवासाचा ‘मुलायम ठेवा’ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याकरिता ‘हिंदी सिनेमा आणि बंगाली दिग्दर्शक’ यांच्या ऐतिहासिक घडामोडींचा, कलावंतांच्या विश्वाचा, त्यांचे कलाविषयक दृष्टिकोन यांचा वेध घेणारा ‘मोनेर मानूष‘ हा अतुल अरुण दाते प्रस्तुत कार्यक्रम रसिकांकरिता ऑनलाईन सादर करण्यात आला. युट्यूबद्वारे तो केव्हाही हवा तेव्हा पाहता येईल.
या कार्यक्रमाबाबत निर्माते आणि सादरकर्ते अतुल दाते सांगतात, झीटी टीव्हीवर ‘सारेगम’ आणि या कार्यक्रमाशी संबंधित गाण्यांचा अभ्यास करत असताना मला प्रांजळपणे असे जाणवले की, हिंदी सिनेमामध्ये बंगाली आणि मराठी माणसाचं योगदान सगळ्यात जास्त आहे. सहा-सात वर्षांपूर्वी मी मराठी दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, कथाकार, संगीतकार, दिग्दर्शक गायक-गायिका यांच्यावर एक कार्यक्रम रचला आणि केला. त्याचे अऩेक कार्यक्रम सादर झाले. त्या कार्यक्रमाचं नाव होतं ‘हिंदी सिनेमातला मराठी माणूस’. हा कार्यक्रम केल्यानंतरसुद्धा अऩेक वर्षे मनात एक खंत लागून राहिली होती की, मला ‘बंगाली दिग्दर्शक आणि हिंदी सिनेमा ‘ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम करायचा होता. हा विचार माझ्या मनात घोळत होता. कारण ‘बंगाली संगीतकार आणि हिंदी सिनेमा’ यावर आधारित कार्यक्रम आधीच सादर झाला होता.
काही आठवणी आणि दिग्दर्शकांची गुणवैशिष्ट्ये
बंगाली ही समृद्ध भाषा असून त्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा विपुल साहित्याची निर्मिती झाली आहे. त्यामुळे बरेचसे सिनेमे हे बंगाली साहित्यावर आधारित आहेत. बंगाली दिग्दर्शकांनी हिंदी सिनेमाकरिता काम केले असले, तरी बंगाली कलाक्षेत्रातही आपली ओळख जपली आहे. यातीलच काही दिग्दर्शकांच्या कार्यकर्तृत्व आणि आठवणींचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. विस्तृत माहिती ‘मोनेर मानूष’ कार्यक्रमातून आपल्याला ऐकता आणि पाहता येईलच.
11 फिल्मफेअर पुरस्कार, दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि कान फिल्म महोत्सवात आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे बिमल रॉय’. बंदिनी (1963), सुजाता (1959), परिणीता (1953) याशिवाय पुर्नजन्मावर आधारित मधुमती (1958) हे त्यांनी दिग्दर्शित केलेले काही सुप्रसिद्ध सिनेमे. त्यांनी दो बिघा जमीन (1953) साली दिग्दर्शित झालेल्या समाजवादी विषयांवर आधारित सिनेमा. हा पहिला सिनेमा आहे ज्याला सर्वश्रेष्ठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे तसेच कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेला पहिला हिंदुस्थानी सिनेमा आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बंदिनी या सिनेमातील ‘मेरा गोरा अंग लई ले मोहे शाम रंग दई दे’ हे गीतकार गुलजार यांनी लिहिलेले गाणे लोकांना आजही ऐकायला आणि गुणगुणायला आवडते.
स्क्रिन रायटर आणि दिग्दर्शक फणी मजुमदार यांनी त्यांच्या करियरला 1930 साली सुरुवात केली. 1941 साली त्यांनी मुंबईला येऊन बॉम्बे टॉकीज स्टुडियो येथे काम करण्यास सुरुवात केली. पंजाबी आणि मागधी भाषेतही सिनेमे तयार केले. मोहोब्बत (1943) या चित्रपटाकरिता शांता आपटे यांच्यासोबत काम केले होते.
साध्या प्रेमकथा, कौटुंबिक कथा, सर्वसामान्यांच्या जगण्यात रोज घडणाऱ्या साध्या सोप्या गोष्टी कथानकातून मांडणार बासू चॅटर्जी. 70च्या दशकात त्यांनी आपल्या सिनेमातून एक स्वतंत्र शैली जोपासली. त्यांच्या सिनेमातला बसने प्रवास करणारा, तर कधी बँकेत नोकरी करणारा, स्कूटरवरून फिरणारा नायक, साडीतील नायिका मध्यमवर्गीय याच्यातून रसिकांमध्ये आपलेच प्रतिबिंब डोकावून जाते. त्यांनी आपल्या सिनेमातून रोजचं जगणं हलकं-फुलकं आणि हळुवार पद्धतीने टिपलंय. ब्लिटझ मासिकातून व्यंगचित्रकार म्हणून 18 वर्षे काम केल्यानंतर ते चित्रपटसृष्टीकडे वळले. ‘पिया का घर’, ‘उस पार’, ‘रजनीगंधा’, ‘छोटीसी बात’, ‘चितचोर’, ‘खट्टा मिठा’, ‘बातो बातो मे. इत्याद सिनेमांतून त्यांनी मध्यमवर्गाची सुख-दु:ख मांडली आहेत. ‘सारा आकाश (1969)’ या चित्रपटातून त्यांची दिग्दर्शनाला सुरुवात झाली. ‘व्योमकेश बक्षी’, ‘रजनी’, या त्यांच्या मालिकाही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कन्या रुपाली गुहा याही दिग्दर्शक असून काही चित्रपट आणि मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.
उत्कृष्ट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक असलेले, लोकप्रिय चित्रपटासाठी काय आवश्यक आहे याची जाण असलेले अमिया चक्रवर्ती. अभिनेत्री आणि निर्मात देविकाराणीच्या ‘बॉम्बे टॉकिज’मध्ये कॅण्टिन मॅनेजर म्हणून नोकरी करणारे अमिया चक्रवर्ती काही काळातच ब़ॉम्बे टॉकिजचे हिंमाशु रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम पाहू लागले. हिमांशू रॉय यांच्या पश्चात बॉम्बे टॉकिजचे आणि इतर संस्थांचे दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी दिग्दर्शित केलेला बसंत हा चित्रपट प्रचंड चालला. हमारी बात , चार आँखे या चित्रपटांसाठी त्यांनी कथा लिहिल्या. त्यानंतर दाग, पतिता, बादशहा, सीमा, देख कबिरा रोया आणि कठपुतली हे सहा अप्रतिम आणि वैशिष्ट्यूर्ण सिनेमे त्यांनी तयार केले. प्रत्येक दिग्दर्शकांचे असे कितीतर सिनेमे सांगता येतील. प्रत्येक सिनेमाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. अशा कितीतरी दिग्गज, नव्या-जुन्या गुणसंपन्न दिग्दर्शकांच्या सिनेमा आणि गाण्यामागील किश्श्यांचा आनंद या कार्यक्रमातून उलगडत जाईल. काहींनी तर पिढीजात हिंदी सिनेमासृष्टीत झोकून देऊन काम केले आहे.
‘मोनेर मानूष’ या हिंदी सिनेमा आणि बंगाली दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कार्यक्रमातील गाणी गायिका पल्लवी पारगावकर यांनी गायली असून त्यांनीच या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे. या कार्यक्रमाच्या ‘मोनेर मानूष’ या वैशिष्ट्यपूर्ण नावाविषयी त्या सांगतात,
‘मोनेर मानूष’ म्हणजे आपल्या जवळचा किंवा आपल्या ह्रदयातला माणूस. हे नाव आम्ही अशासाठी ठरवलं की, विमल रॉयपासून आतापर्यंत जे सगळेच दिग्दर्शक आपल्याला खूप जवळचे आहेत. म्हणजे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमातून आपण आपल्याच आयुष्यातला एक भाग बघत आहोत, ही जाणीव मनाला होत राहते, याकरिता या कार्यक्रमाचं नाव ‘मोनेर मानूष’ असं ठेवलं आहे. मुख्यत: सगळ्याच बंगाली दिग्दर्शकांनी हिंदी सिनेमामध्ये जे योगदान दिलंय. तसेच बंगालचं साहित्य आणि संगीत हे दोन्ही घेऊन ते इकडे आले. या दोन्ही कलाकृतींचा वापरही त्यांनी अत्यंत कौशल्यपूर्णरित्या हिंदी सिनेमांमध्ये केला.
कार्यक्रमाचं वेगळेपण
विमल रॉयपासून आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासह सगळ्याच दिग्दर्शकांनी हिंदी सिनेमासाठी खूप काम केलंय. पण या लोकांनी हिंदी सिनेमा सुंदर सुंदर गाणी, संगीत दिलंय, त्यांच्या स्टोरीलाईनही छान आहेत. हे कुठेतरी मांडलं जावं, कोणीतरी मांडणं फार गरजेचं होतं. पुढच्या पिढीला, सिनेसृष्टीच्या नवोदित अभ्यासकांना कळावं, बंगाली दिग्दर्शकांची कामातील कुशलता कळावी, त्यांनी केलेल्या कामातल्या छोट्या छोट्या गोष्टी रसिकांना कळाव्यात. याकरिता या कार्यक्रमाची नक्कीच मदत होईल, असे गायिका आणि निवेदिका पल्लवी पारगावकर यांनी स्पष्ट केले.
बिमल रॉय यांच्या कथेचा जन्म, ती कथा केव्हाही पाहिली तर ती आपण आपल्यासोबत रिलेट करू शकतो. हे त्यांच्या काळापासून सुरू झालंय. हेच त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य आहे. ‘ओम शांती ओम’च्या सिनेमाच्या फॉर्म्युल्यावर अजूनही सिनेमा होत आहेत. पण हे कधी तरी, कोणीतरी आधीच सुरू केलं होतं. ते कोणी तर बंगाली दिग्दर्शकांनी ! अशा काही दिग्दर्शकांचा मागोवा, त्यांची गुणवैशिष्ट्ये याबरोबरच त्यांच्या सिनेमातलं आल्हाददायक संगीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकण्याची संधी रसिकांना मिळेल.
खरं सांगायचं तर प्रत्येक दिग्दर्शकावर एक अख्खा कार्यक्रम होऊ शकतो. एवढं प्रचंड काम त्यांनी या क्षेत्रात केलंय. त्यामुळे दोन ते अडीच तासांत त्यांच्या कामाची शैली, स्वभावाचे पैलू, कलेतलं नाविन्य हे सगळे घटक मांडू शकत नाही. त्यांच्या फक्त एका सिनेमावर बोलण्यासारखंही बरंच काही आहे, पण तरीही त्यांच्या काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध सिनेमा आणि गाण्यांची माहिती, महत्त्वाची सूत्रे मांडणे हे या कार्यक्रमाचे निमित्त आहे.
गायक म्हणून गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला पहिल्यांदाच निवेदन करण्याची संधी मिळाली. या अऩुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळाले, या प्रश्नाला उत्तर देताना पल्लवी पारगावकर आपले मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, मला आज गायिका म्हणून असं सांगावसं वाटतं की, त्या प्रत्येक गाण्याची एक स्टोरी लाईन आहे. हे गाणं का घेतलं होतं ? असा विचार गायकाकडून केला जात नाही. काही वेळा आपण फक्त एक गायक म्हणून ते गाणं गातो, ऐकतो आणि सोडून देतो. पण या गाण्यामागची पार्श्वभूमी काय किंवा हे गाणं का गायलं गेलं? मुळात गाणं कसं घडलं ? अशा बारीकसारिक गोष्टी मला कार्यक्रमाच्या निमित्ताने शिकायला मिळाल्या. त्यामुळे आज माझा गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तसेच निवेदनाचा अभ्यास खूपच आहे. सिनेमा बघताना आपण फक्त ते गाणं बघतो पण त्याच्या मागचं जे काही घडतं ते मला निवेदनाच्या अभ्यासातून कळलं. तसेच गाण्याचं, गाण्यातल्या शब्दांचं किती महत्त्व आहे, स्टोरी लाईन हे मला निवेदक म्हणून आज जाणवतंय. गायिका असताना मी एवढा विचार केला नव्हता. निवेदनामुळे माझं गाणं ‘मॅच्युअर’ झालं.
दिग्दर्शकांच्या कार्याचा, कामाचा आढावा घेताना तुम्हाला कोण भावलं; याविषयी त्या स्पष्ट करतात की, आपल्या संस्कृतीमध्ये कथांचे वेगवेगळे प्रकार आहेत. पौराणिक, ऐतिहासिक, दंतकथा इत्यादी. लहाऩपणापासून आपण कथा ऐकतो, वाचतो, बघतो. ‘परिणिता’ हा सिनेमा यापूर्वी एकाने बनवला होता. त्यानंतर बिमल रॉयनी पण बनवला होता. आज प्रदीप सरकारने पण बनवला आहे. ‘देवदास’ सिनेमाही बऱ्याच दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केला आणि आजही इतरांना बनवावासा वाटतो, पण प्रत्येक कथेचा दिग्दर्शक वेगळा असतो. त्याचा विचार करण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. उदा. संजय लिला भन्साळी यांनी देवदास बनवला आणि विमल रॉय यांनी ‘देवदास’ बनवला. स्टोरी सारखीच आहे, पण या दोन्ही सिनेमांकरिता त्यांनी केलेलं काम संपूर्णत: वेगळं आहे. कृष्णधवलपासून रंगीतपर्यंत जसजसं जनरेशन बदलत जाते. सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी आजही सुरू आहेत. त्यामुळे कोणीतरी एक दिग्दर्शक भावले आहेत, असं म्हणणंच चुकीचं ठरेल. बंगाली साहित्यावरून बऱ्याचशा सिनेमांच्या कथा दिग्दर्शित झाल्या आहेत. यातही काही दिग्दर्शकांनी स्टोरीलाईनला जास्त महत्त्व दिलं आहे. काहींना सिनेमाच्या कथेबरोबर गाणी महत्त्वाची वाटतात. अशोक सेनने यांच्या ‘खामोशी’ सिनेमामधली गाणी बघितली तर असं वाटतं की, गाण्याचे शब्द किंवा डायलॉगमधून जे समजू शकत नाही ते इथे फक्त त्या गाण्याला स्टोरीलाईनबरोबर एकरूप केलंय. त्यामुळे अशा बारीकसारीक गोष्टींवर खूप काम झालं आहे. म्हणजेच काही दिग्दर्शकांनी गाण्याला महत्त्व दिलय, तर काहींनी कथेला महत्त्व दिलंय, हे लक्षात आलं. महत्त्वाचं म्हणजे सगळेच दिग्दर्शक दिग्गज आहेत. सिनेसृष्टीत त्यांनी प्रचंड काम केलंय. त्यामुळे आपल्यालाही प्रश्न पडतो की, किती सांगायचं, पण त्यातही जे जे महत्त्वाचं, पण शॉर्ट अँड स्वीट आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आकर्षक चालीतली आशयसंपन्न गाणी
सिनेमांकरिता वेगवेगळ्या बंगाली दिग्दर्शकांची काम करण्याची पद्धत, त्यांचा कामातला खरेपणा वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या सिनेमातल्या मनाला भावणाऱ्या संगीतात फक्त प्रेम नाही, तर प्रेमाव्यतिरिक्तही या गाण्यांनी शिकवलेली जीवन जगण्याची कलाही शिकवलीय असं ती ऐकताना वाटत राहतं. त्यामुळे काही चित्रपट फक्त गाणी ऐकण्याकरिताही प्रेक्षक बघत असत. आजही बघतात. उदा. अमिया चक्रवर्तींचा ‘देख कबीरा रोया’ हा त्यापैकीच एक चित्रपट. तसेच त्यांच्या ‘सीमा’ या चित्रपटातलं रचना आणि गीतकार हसरत जयपुरी, संगीत शंकर जयकिशन आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्धी केलेलं ‘बात बात मे रुठो ना, अपने आपको लुटो ना…ये रंग बदलती दुनिया है, तकदीर पे अपनी रुठो ना’ या गाण्यातल्या कविचं हे सांगणं फक्त नायिकेसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच आहे. छोट्याशा कारणावरून आपणही कधीतरी निराश होत असतो नाही का ? हे गाणं म्हणजे एक उदाहरण झालं. अशाच प्रकारची ‘कभी तो मिलेगी, कही तो मिलेगी; बहारोंकी मंजिल राही’, ‘किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया’, ‘रात और दिन दिया जले फिरभी मेरे मनमे फिरभी अंधियारा है’, ‘तेरा मेरा साथ रहे, धूप हो छाया हो दिन हो के रात रहे’, ‘एहसान तेरा होगा मुझपर दिल चाहता है वो कहने दो मुझे तुमसे मुहोब्बत’, ‘बडे अच्छे लगते है…ये धरती, ये नदीया, ये रैना और तुम’….अहाहा …अशी कितीतरी सुमधुर, श्रवणीय गाणी त्यांच्या सिनेमातून ऐकायला मिळतात. प्रत्येक काव्याला साजेशी चाल आणि संगीत देऊन एकापेक्षा एक कर्णमधुर सुंदर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. गीतकारांनीही आपल्या काव्यातून आयुष्यावर भाष्य करणाऱे शब्द त्यात गुंफले आहेत. ही गाणी घडताना त्यांना काय अडचणी, याकरिता कलाकारांना घ्यावी लागलेली मेहनत या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. यामुळे सिनेमाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो.
प्रतिभासंपन्न, गुणी दिग्दर्शकांचा मनोरंजनात्मक प्रवास
हल्लीचे अयाम मुखर्जी, प्रदिप सरकार, अऩुराग बासू यांच्याविषयी लोकांना माहिती आहे; पण त्याच्याही आधीच्या फार जुन्या दिग्दर्शकांविषयी, त्यांच्या कामाविषयी फार कोणाला माहिती नाही. ऋतुपर्ण घोष हे फक्त बंगालमध्ये मोठं नाव नाही. त्यांनी हिंदीत एकच सिनेमा दिग्दर्शित केलाय, पण हा सिनेमा अजूनही लोकांच्या लक्षात आहे. आज कदाचित ‘मोनेर मानूष’ची ही मालिका बघितल्यानंतर मला असं वाटतं की, आपण मागे जाऊन जुने सिनेमे बघितले तर सिनेमे आपण अजून आवडीने बघू शकू. कारण मला आता ते सगळे सिनेमे बघताना खूप इंटरेस्टिंग वाटतं. त्याचं स्ट्रगल, ते घडताना जे छान छान किस्से झाले आहेत ते पण मला माहिती आहेत त्यामुळे सिनेमा मुळापासून लक्षात येतो, राहतो. हे किस्से या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना ऐकता येतील. त्यांच्या सिनेमातील काही प्रसिद्ध गाणी ऐकायला मिळतील त्यामुळे सिनेमा आणि संगीताची आवड असणाऱ्या रसिकांनाही घेता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद घेता येईल, असे मत गायिका आणि कार्यक्रमाच्या निवेदिका पल्लवी पारगावकर व्यक्त करतात.

























































