लक्षवेधी धरणे आंदोलनानंतर बेस्ट प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, थकीत देणी मिळणार, बेस्ट महाव्यवस्थापकांनी शिष्टमंडळाला दिले आश्वासन

बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लक्षवेधी धरणे आंदोलनामुळे प्रशासन अखेर ‘अ‍ॅक्शन मोड’वर आले. सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या ग्रॅच्युईटीसह इतर थकीत देणी लवकरात लवकर देण्यात येतील, आवश्यक निधी मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि पालिका आयुक्तांसोबत आठवडाभरात बैठक घेतली जाईल, असे आश्वासन बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी मंगळवारी सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या शिष्टमंडळाला दिले. तसे लेखी पत्र मिळाल्यानंतर लक्षवेधी धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर यांच्या नेतृत्वाखाली दत्तात्रेय धनावडे, मेहबूब सुतार, मनोहर जुन्नरे, जयवंत तावडे, विवेक घोलप, सुरेश जागडे, चंद्रकांत सावंत यांच्या शिष्टमंडळासोबत बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी बैठक घेतली. त्यासंदर्भात लेखी पत्र देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. ती मागणी मान्य करीत बेस्ट उपक्रमाकडून लेखी पत्र देण्यात आले. त्यानंतर निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांनी लक्षवेधी धरणे आंदोलन मागे घेतले.

…तर चड्डी-बनियन आंदोलन करणार!

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाव्यवस्थापकांशी झालेल्या बैठकीतदेखील आक्रमक भूमिका मांडली. बेस्ट उपक्रम पक्षपाती वागत आहे. जे कर्मचारी अडीच वर्षांपूर्वी निवृत्त झाले त्यांना थकीत देयकांसाठी तिष्ठत ठेवले जात आहे. हक्काची रक्कम मिळण्याच्या प्रतीक्षेत अनेक कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. यापुढे कोणतीही दिरंगाई खपवून्aा घेणार नाही. वेळीच थकीत देयके न दिल्यास चड्डी-बनियन आंदोलन करू, असा इशारा शिष्टमंडळाने बैठकीदरम्यान दिला.