
गुजरातसह संपूर्ण देशभर गाजलेले वडोदरा येथील बेस्ट बेकरी हत्याकांड घडून तब्बल 21 वर्षे उलटल्यानंतर या घटनेतील दोन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्त केले. गुजरातच्या गोध्रा जळीतकांडानंतर बेस्ट बेकरीवर संतप्त जमावाने हल्ला केला होता. त्या जमावामध्ये हर्षद सोलंकी व मफत गोहिल या दोघांचा सहभाग होता हे सिद्ध करणारे सबळ पुरावेच नाहीत, असे मत नोंदवत सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी सोलंकी व गोहीलला निर्दोष ठरवले.
सरकारी पक्षाने तपासलेल्या दहा साक्षीदारांपैकी चार साक्षीदार प्रत्यक्षदर्शी होते. त्यातील केवळ तीन साक्षीदार न्यायालयापुढे हजर झाले. त्यापैकी एकानेही आरोपींना न्यायालयात ओळखले नाही. एकाने गोहिलला ओळखले, मात्र तो त्याचे नाव सांगू शकला नाही. तसेच गोहिलने 2002 मध्ये त्या दिवशी नेमके काय केले होते हेदेखील तो साक्षीदार सांगू शकला नाही. त्यावर आरोपी व साक्षीदार हे एकमेकांच्या शेजारीच राहत होते. त्यामुळे 21 वर्षांनंतरही ते नजरेने एकमेकांना ओळखत असतील. मात्र त्याआधारे आरोप सिद्ध होत नाहीत, असा दावा बचाव पक्षाने केला होता. त्याच आधारे न्यायालयाने दोघांना निर्दोष सोडले, असे अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांनी सांगितले.
बेस्ट बेकरी हत्याकांडाचा मुख्य खटला चालला त्यावेळी सोलंकी आणि गोहिल हे दोघे बेपत्ता होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध 2019 पासून स्वतंत्र खटला चालवण्यात आला. 2013 मध्ये अटक झाल्यापासून हे दोघे आर्थर रोड कारागृहात पैद होते. गोध्रा येथे साबरमती एक्प्रेस जाळल्यानंतर 1 मार्च 2002 रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडीवरील बेस्ट बेकरीवर एक हजाराहून अधिक लोकांच्या संतप्त जमावाने हल्ला केला होता. त्यात 14 लोकांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोर जमावात सोलंकी व गोहिल यांचाही सहभाग होता, असा आरोप सरकारी पक्षाने केला होता. मुंबई सत्र न्यायालयात 2019 मध्ये सोलंकी व गोहिलसह एकूण चार आरोपींविरुद्ध खटला उभा राहिला होता, मात्र खटला प्रलंबित असतानाच अन्य दोघांचा मृत्यू झाला. सोलंकी व गोहिलविरुद्ध सरकारी पक्षाने 10 साक्षीदार तपासले. सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी 17 जानेवारीला निकाल राखून ठेवला होता. या खटल्यात बचाव पक्षातर्फे अॅड. प्रकाश साळसिंगीकर आणि सरकारी पक्षातर्फे अॅड. मंजुळा राव यांनी काम पाहिले.
21 वर्षांत नेमके काय घडले?
1 मार्च 2002 – बेस्ट बेकरीवरील हल्ल्यात 14 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेकरी मालकाची मुलगी झहिरा शेख हिच्या तक्रारीवरून गुजरात पोलिसांनी 21 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल.
2003 – वडोदरा येथील जलदगती न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. तो निकाल गुजरात उच्च न्यायालयानेही कायम ठेवला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले.
2004 – सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुन्हा खटला चालवण्याचे निर्देश देत हे प्रकरण गुजरातबाहेर चालवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे हा खटला मुंबईत वर्ग करण्यात आला. मुंबईतील सत्र न्यायालयाने नऊ जणांना जन्मठेप सुनावली, तर 12 जणांना निर्दोष मुक्त केले.
2012 – मुंबई उच्च न्यायालयाने नऊ दोषींपैकी पाच जणांची जन्मठेप कायम ठेवली, मात्र उर्वरित चौघांना निर्दोष ठरवले.
2013 – हर्षद सोलंकी, मफत गोहिल या दोघांना अटक.
2019 – सोलंकी आणि गोहिल या दोघांसह एकूण चौघांविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला उभा राहिला.


























































