
दादरच्या प्लाझा सिनेमाजवळील बेस्ट बसचा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा निष्कर्ष आरटीओच्या प्रथमदर्शनी अहवालात काढण्यात आला आहे. बसचा ब्रेक निकामी झाल्याचा दावा चालकाने केला होता. मात्र बसचे ब्रेक सुस्थितीत होते, असे आरटीओ अधिकाऱयांनी म्हटले आहे. दरम्यान, बसमधील ऑक्सिलरेटर, ब्रेक आणि हँडब्रेक यांसारख्या तांत्रिक बाबींचीही सखोल तपासणी केली जाणार असून त्याच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान, कांदिवलीत आज पादचाऱयांना बसने उडवल्याची घटना घडली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. बोरिवली पश्चिम ते कांदिवली पश्चिम दरम्यान धावणाऱया बेस्टच्या ए-277 मार्गावरील इलेक्ट्रिक बस सकाळी 11.50 वाजता पोईसर डेपोजवळ आली असता ही घटना घडली. या घटनेत सोनम मौर्या व आदर्श हिरालाल यादव हे दोघे जण जखमी झाले.




























































