बेस्टमध्ये ‘क्युआर कोड’द्वारे केवळ 8,479 प्रवाशांची तिकीट खरेदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात प्रवासी व वाहवांमध्ये नोटांची देवाण घेवाण टाळण्यासाठी प्रवाशांना ‘क्यूआर कोड’ द्वारे तिकीट वाढण्याच्या अभिनव प्रयोगाला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या बेस्टद्वारे दररोज 14 लाख प्रवासी प्रवास करीत असून जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या ‘क्यूआर कोड’द्वारे तिकीट काढण्याच्या प्रयोगाला केवळ 8 हजार 479 प्रवाशांनी प्रतिसाद दिल्याचे बेस्ट सूत्रांनी सांगितले.

बेस्ट बसेसमध्ये 8 जूनपासून सर्वसामान्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. नोटांमुळे कोरोना प्रसाराचा धोका असल्याने बेस्टने ही देवाणघेवाण टाळण्यासाठी ‘क्यूआर कोड’द्वारे प्रवास भाडे भरण्याची सुविधा आणली आहे. 16 जूनपासून कडाळा, कुलाबा व देवनारपासून ही योजना सुरू झाली. त्यानंतर मालवणी, मुंबई सेन्ट्रल, शिवाजी नगर, गोवंडी, गोरेगाव, प्रतिक्षा नगर, पोयसर, सांताक्रुझ आदी 14 बस आगारात ही सेवा लागू झाली. आता सर्क बस आगारांमार्फत बसगाडय़ांमध्ये सुविधा उपलब्ध झाली आहे.

प्रवाशांना फोन पे, गुगल पे, पेएटीएम अशा युपीआय ऍपमधील ‘क्यूआर कोड’ पद्धतीच्या सहाय्याने प्रवास भाडे भरण्याची सुविधा यात आहे. परंतु सध्या केवळ ‘फोन पे’ची सुविधा उपलब्ध केली असून अन्य अॅपची सेवाही लवकरच सुरू होणार आहे. प्रकाशाने प्रवासाची माहिती दिल्यानंतर कंडक्टर प्रवास भाडे सांगतात. त्यानंतर प्रवाशांना आपल्या मोबाईलद्वारे बेस्टच्या कंडक्टरकडील ‘क्यूआर कोड’ स्कॅन करुन सध्या ‘फोन पे’ युपीआय अॅपद्वारे तिकीटाची रक्कम ऑनलाइन भरण्याची सोय आहे. ही रक्कम भरताच प्रवाशांच्या भ्रमणध्वनीवर अदा केलेली रक्कम, बस कंडक्टरचा ओळख क्र. आणि आगार प्रदर्शित होत असून त्यानंतरच कंडक्टर प्रवाशाला तिकीट देतो. जुलै महिन्यात केवळ 1,500 प्रवाशांनीच या ‘क्युआर कोड’आधारे तिकीटाचे पैसे भरण्याच्या योजनेचा लाभ घेतला होता. ऑगस्टअखेरपर्यंत हीच संख्या 8 हजार 479 एवढी झाली आहे.