
गत मोसमातील सर्वोत्तम फुटबॉल कोण, याचे उत्तर येत्या 17 डिसेंबरला मिळणार आहे. फिफाकडून शुक्रवारी रात्री पुरुष तसेच महिला विभागाच्या विविध गटांसाठी पुरस्कार विजेत्या रेसमध्ये असलेल्या अंतिम नावांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. पुरुष गटात सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान मिळवण्यासाठी तिहेरी लढत रंगणार आहे. यावेळी लियोनेल मेस्सी, ख्रिस्तीयानो रोनाल्डो व रॉबर्ट लेवानडोस्की यांच्यामध्ये चुरस लागणार आहे.
पोलंड, बायर्न म्युनिचचा खेळाडू प्रबळ दावेदार
पोलंड देश व बायर्न म्युनिच या क्लबसाठी खेळणारा रॉबर्ट लेवानडोस्की या वर्षी सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याने बायर्न म्युनिचसाठी खेळताना 47 सामन्यांमधून 55 गोल केले असून 10 गोल करण्यात त्याचे सहकार्य लाभले आहे. ख्रिस्तीयानो रोनाल्डो मात्र 37 व लियोनेल मेस्सीला फक्त 31 गोलच करता आले आहे. यावेळी 27 गोल करण्यात लियोनेल मेस्सीचे सहकार्य लाभले आहे. रॉबर्ट लेवानडोस्कीने बायर्न म्युनिचला या वर्षी चॅम्पियन्स लीग, जर्मन कप, जर्मन लीग, यूएफा सुपर कप जिंपून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी त्याचेच पारडे जड आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या पुरस्कार विजेता सोहळा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.
पुरुष गट
सर्वोत्तम खेळाडू
लियोनेल मेस्सी, ख्रिस्तीयानो रोनाल्डो, रॉबर्ट लेवानडोस्की
सर्वोत्तम गोलकीपर
एलीसन बेकर, मॅन्युअल न्यूएर, जॅन ओबलक
सर्वोत्तम प्रशिक्षक
मार्सेलो बिल्सा, हान्स फ्लिक, जर्गेन क्लॉप
महिला गट
सर्वोत्तम खेळाडू
ल्यूसी ब्राँझ, परनील हार्डर, वेण्डी रेनार्ड
सर्वोत्तम गोलकीपर
साराह बाऊहादी, ख्रिस्तीयन एण्डलर, एलीस नेईहेर
सर्वोत्तम प्रशिक्षक
इमा हायेस, जीन वॅसूएर, सरीना विगमन



























































