बेस्टची ग्राहकांसाठी सवलतीची ‘गो ग्रीन’ ई-वीज देयक प्रणाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टने वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत देणारा ‘गो डिजिटल, गो ग्रीन’ हा नवा उपक्रम आणला असून त्यात ऑनलाइन वीज देयके भरणाऱयांना विविध सवलती दिल्या जाणार आहेत. या उपक्रमाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कुलाबा बेस्ट भवन येथे सोमवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर, महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

‘गो ग्रीन’ या उपक्रमाअंतर्गत वीज ग्राहकांनी ई-वीज देयक प्रणालीचा वापर केल्यास वर्षाला 120 रुपयांची सवलत मिळणार आहे. ऑनलाइन वीज देयके भरणा करणाऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना बेस्ट प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्राहकांना ई-वीज देयके स्वीकारण्याचे आवाहन केले, तसेच बेस्ट प्रशासनाने जगातील सर्वोत्तम सेवा प्रवाशांना देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिकाधिक प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बसेसचा वापर केला पाहिजे, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. बेस्ट प्रवाशांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ योजना आणत असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत लवकरात लवकर ही योजना अमलात आणावी, अशी अपेक्षा यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.