
सामना प्रतिनिधी । मुंबई
बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या दोन कि.मी.साठी आठ रुपये मोजावे लागणाऱया मुंबईकरांना आता पाच कि.मी.पर्यंतच्या अंतरास केवळ पाच रुपये द्यावे लागणार आहेत. या प्रस्तावावर उद्या बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा होऊन त्यास मंजुरी मिळणार आहे. प्रौढ आणि बालकांना मात्र सारखेच तिकीट दर राहणार आहेत. या नव्या भाडे रचनेमुळे जवळच्या अंतराच्या प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
बेस्टची भाडेरचना सुलभ, स्पर्धात्मक आणि ग्राहकस्नेही करण्यासाठी विद्यमान असलेल्या 15 बसभाडे टप्प्यांऐवजी सर्वसाधारण, मर्यादित, जलद आणि वातानुकूलित बस सेवांकरिता 5, 10, 15 आणि 15 कि.मी.पेक्षा अधिक असलेल्या केवळ चार प्रकारच्या अंतराचे बसभाडे टप्पे ठेवण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव उद्या (शुक्रवारी) होणाऱया समितीच्या बैठकीत चर्चेसाठी येणार आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर नवीन भाडेदर लागू होणार आहे.
नव्या प्रस्तावानुसार पाच कि.मी.पर्यंतच्या प्रवासासाठी पाच रुपयांचे तिकीट असणार आहे. त्यानंतर 10 कि.मी.साठी 10 रुपये, 15 कि.मी.पर्यंतच्या अंतरासाठी 15 रु. आणि 15 कि.मी. पुढील अंतरासाठी 20 रुपये तिकीट दर असणार आहेत. तर दैनिक पास 50 रुपयांना असणार आहे. वातानुकूलित बसचे दरही कमी ठेवण्यात येणार आहेत. वातानुकूलित बससाठी तिकीट पाच कि.मी.पर्यंतच्या अंतरासाठी 6 रु., 10 कि.मी.पर्यंतच्या अंतरासाठी 13 रु., 15 कि.मी.पर्यंतच्या अंतरासाठी 19 रुपये आणि 15 कि.मी.पुढील अंतरासाठी 25 रु. तिकीट दर असतील. तर दैनंदिन पाससाठी आता पन्नास रुपये तर वातानुकूलित दैनंदिन पासासाठी 60 रुपये आकारण्यात येणार आहेत.
असे असणार नवीन तिकीट दर
कि.मी. साधी बस एसी बस
5कि.मी. 5रु. 6रु.
10कि.मी. 10रु. 13रु.
15कि.मी. 15रु. 19रु.
15कि.मी.च्या पुढे 20रु. 25रु.




























































