‘बेस्ट’ला तिकीट दरवाढीचा फटका; 8 लाख प्रवासी घटले

आर्थिक संकटात असलेल्या बेस्टने तिकीट दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून बेस्टच्या महसुलात वाढ झाली. मात्र, प्रवाशांची संख्या 31 लाखांवरून कमी होऊन 23 लाखांवर आली आहे. बेस्टचे सुमारे 8 लाख प्रवासी घटले आहेत. त्यामुळे बेस्टने घेतलेल्या या निर्णयाने उपक्रमाला फायदा झाला की, तोटा हे आणखी काही महिन्याने स्पष्ट होणार आहे.

कोटय़वधीच्या आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने 9 मे पासून तिकीट दरात वाढ लागू केली. त्यामुळे बेस्टच्या रोजच्या महसुलात वाढ झाली आहे. बेस्टने साध्या बससाठी पहिल्या पाच किमीसाठी 5 रुपयांऐवजी 10 रुपये तर वातानुकूलित बससाठी पहिल्या पाच किमीसाठी 6 रुपयांऐवजी 12 रुपये अशी तिकीट दरवाढ केली. ही दरवाढ केल्यानंतर 9 मे रोजी 23 लाख 17 हजार प्रवाशांनी प्रवास केला, तर त्यामधून बेस्टला तब्बल 2 कोटी 93 लाख 41 हजार रुपयांचा महसूल मिळाला. बेस्टची दरवाढ होण्याआधी 8 मे आधी रोज 31 लाख 50 हजार प्रवासी प्रवास करत होते तर प्रवाशांच्या माध्यमातून रोज 1 कोटी 75 लाखांचा महसूल बेस्टच्या तिजोरीत जमा होत होता.

तारीख प्रवासी महसूल

9 मे 23 लाख 17 हजार 2 कोटी 93 लाख 41 हजार रुपये
10 मे 19 लाख 58 हजार 2 कोटी 56 लाख 64 हजार
11 मे 14 लाख 81 हजार 1 कोटी 98 लाख 16 हजार रुपये
12 मे 19 लाख 82 हजार 2 कोटी 68 लाख 28 हजार रुपये
13 मे 21 लाख 54 हजार 2 कोटी 83 लाख 20 हजार रुपये