
कोरोना काळात ‘बेस्ट’कडून जादा वीज बिले पाठवल्याच्या आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पालिकेने पाच सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानंतर याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात बेस्टकडून वीज ग्राहकांना वाढीव दराने वीज बिले पाठवण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालिकेने चौकशीचे आदेश देत मुख्य लेखा परीक्षक सीताराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली अनिल बडगुजर (उप मुख्य लेखा परीक्षक) सचिव, महेंद्र उरणकर, (सहाय्यक महाव्यवस्थापक)-सदस्य, रा. या. डुबल-(सहाय्यक महाव्यवस्थापक)-विधी सदस्य, आनंद पाटील (लेखापरीक्षा)-सदस्य या पाच अधिकाऱयांची समिती नेमली आहे. ही समिती याप्रकरणी सुनावणी घेऊन आपला अहवाल प्रशासनाला देणार आहे.



























































