
सद्यस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. त्यामुळेच कोरोना नियंत्रणात आला असून लवकरच मुंबई कोरोनामुक्त होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच आगामी काळात मुंबईकरांना आणखी दर्जेदार सुविधांसह 24 तास पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 22 नोव्हेंबर रोजी पेडणेकर याच्या महापौरपदाच्या यशस्वी कारकीर्दीची वर्षपूर्ती होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी दैनिक ‘सामना’शी संवाद साधला.
गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कोरोना विरोधातील लढा महत्त्वपूर्ण ठरला आहे. यामध्ये महापौर किशोरी पेडणेकर स्वतः पालिकेच्या कोरोनाविरोधातील लढय़ात नेहमीच अग्रस्थानी राहून पुढाकार घेतला आहे. महापौर मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रुग्णालयांना भेटी देऊन वारंवार आढावा घेत आहेत. आरोग्य सेविकांचे मानधन वाढवणे, लॉकडाऊनमध्ये कोणतेही कामगार, परप्रांतीय मजूर, गरजू उपाशी राहू नये यासाठी व्यवस्था राबवणे, नागरिक-रुग्ण-प्रशासनाच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना करणे, ‘बेस्ट’ची सुविधा उपलब्ध करून देणे, जम्बो कोविड सेंटरला भेटी देऊन आढावा घेणे आणि आवश्यक उपाययोजना त्यांनी केल्या.
महापौर निधी 42 लाखांवर
महापौर पेडणेकर यांनी आपल्या कुटुंबाला मिळणारे वाहन नाकारून ही रक्कम महापौर निधीत जमा करण्यास सांगितले. नगरसेवक पदाचे मानधनही महापौरी निधीसाठी दिले. सामाजिक संघटना, संस्थांच्या सत्कार समारंभांवर खर्च होणारा अपव्यय टाळून हा निधी महापौर निधीत जमा करण्यास प्रोत्साहन दिले. विविध कंपन्यांनाही सीएसआर फंड महापौर निधीत जमा करण्यास सांगितले. याला चांगलेच यश आले असून कोरोना काळात 42 लाख 30 हजारांचा महापौर निधी जमा झाला आहे.
ध्येय सर्वांगिण विकासाचे
मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी प्रभाग समिती बैठकींना प्राधान्य देत असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. या शिवाय विकासकामे, रस्ते, प्रकल्पांत येणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करून विकासाचे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देणार आहे. एकंदरच मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी नगरसेवक पालिका प्रशासन, आयुक्त, राज्य सरकारशी यांच्याशी चर्चा-समन्वय साधून मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी काम केले जात आहे.



























































