
सामना ऑनलाईन । गोंदिया
महाराष्ट्रातील पालघर, भंडारा-गोंदिया दोन लोकसभा मतदार संघासह देशात ४ ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येते आहे. गोंदियात सुरू असलेल्या मतदानावेळी दुपारपर्यंत २०० हून अधिक इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती येत होती. त्यानंतर ३५ केंद्रावरील मतदान तातडीने थांबवण्यात आली आहे. खासगी वृत्तवाहिन्यांनी यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे.
इव्हीएम मशीनबद्दल घोळाविरोधात भाजप वगळता सर्व पक्षाच्या नेत्यांनी आवाज उठवला होता. मात्र त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अखेर आज त्याचा महाफटका पोटनिवडणुकांना बसला आहे. भंडारा-गोंदियात सकाळपासूनच इव्हीएम मशीनच्या संदर्भात तक्रारी येत होत्या. या तक्रारी वाढतच गेल्या. गोंदियात तर २००हून अधिक ठिकाणी इव्हीएमचा गोंधळ असल्याचे आरोप करण्यात आले. अखेर ३५ मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया तातडीने थांबवण्यात आल्याची माहिती साहाय्यक निवडणूक आयुक्त अनंत वालसकर यांनी दिली. ज्या ठिकाणी इव्हीएम मशीन काम करत नाही, असे लक्षात आले आहे, तिथे मतदान थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र असे असले तरी उर्वरित सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरू असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक अहवाल आम्ही निवडणूक आयोगाला पाठवला आहे. यावर निवडणूक आयोग जो निर्णय घेईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भंडारा, गोंदियात फेरमतदान घ्या!
भंडारा, गोंदियात तब्बल ४५० मशीन बंद असल्याची तक्रार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच इव्हीएमसोबत जाणीवपूर्वक छेडछाड झाली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

































































