
पालिका प्रशासनामधील काही अधिकाऱयांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच ड्रीम्स मॉलसारख्या आगीच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे या आगीच्या चौकशीसाठी स्थायी समिती सदस्यांचा समावेश असलेली उपसमिती नेमा, अशी जोरदार मागणी आज स्थायी समितीत करण्यात आली. तसेच पुढील बैठकीत या दुर्घटनेबाबत खुद्द पालिका आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
भांडुप येथील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत तिसऱया मजल्यावरील सनराइज रुग्णालयातील 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याबाबत समाजवादी पक्षाचे गटनेत रईस शेख यांनी आज हरकतीचा मुद्दा उपस्थित करून या दुर्घटनेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला. पालिका आयुक्तांना या ठिकाणच्या त्रुटींबाबत पत्रे देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याचेही ते म्हणाले. हरकतीच्या मुद्दय़ाला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पाठिंबा देत पालिका आयुक्त आरोपांबाबत स्पष्टीकरण का देत नाहीत, असा सवाल केला. आयुक्त जोपर्यंत बैठकीला येत नाहीत तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या घटनेच्या चौकशीसाठी उपायुक्त प्रभात रहांगदळे यांना नेमण्यात आले आहे. मात्र या विभागाचे प्रमुख राहिलेले रहांगदळे या घटनेची निःपक्ष चौकशी कशी करणार, असा सवाल सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पालिकेने आर्थिक मदत करावी अशी मागणीही राऊत यांनी केली. यावेळी सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्दय़ांचे सविस्तर लेखी उत्तर पुढील बैठकीत द्यावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

























































