भांडुपमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडुप (पश्चिम) परिसरात शनिवारी सकाळी निवासी इमारतीचा काही भाग कोसळून 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे 9:45 वाजण्याच्या सुमारास तुळशीपाडा, पाटकर कंपाउंड येथे घडली. ग्राउंड प्लस वन (G+1) रचनेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने नवकार रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी सकाळी 9:52 वाजता त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख सुसाई देवदास कौंडर (वय 75), राहणार भांडुप (पश्चिम) अशी झाली आहे.

दरम्यान, पुढील दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून इमारतीची तसेच परिसरातील इतर इमारतींची स्थिती तपासली जात आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी इमारतीच्या कमकुवत संरचनेमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.