बंद फसफसला! मुंबईसह महाराष्ट्रात व्यवहार सुरळीत

30

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेला देशव्यापी बंद अक्षरशः फसफसला आहे. 21 लहानमोठय़ा विरोधी पक्षांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी फार काही प्रभाव दिसलाच नाही. मुंबई, ठाणे, पुण्यासह महाराष्ट्रात सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. देशात केवळ बिहार, राजस्थान, पंजाब, हरयाणा या उत्तरेतील राज्यांमध्ये प्रभाव जाणवला. उत्तर प्रदेशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. राजधानी दिल्लीसह पश्चिम बंगाल, तामीळनाडूत जनजीवन सुरळीत सुरू होते.

कुठे काय घडले?

दिल्ली – राजधानी दिल्लीतच बंदला पाठिंबा मिळाला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. रामलीला मैदानावर काँग्रेस पक्षाने धरणे आंदोलन केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया  गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शरद यादव, आपचे खासदार संजय सिंह आदी नेते सहभागी झाले होते. काँग्रेस पक्षाने दिल्लीत विविध ठिकाणी आंदोलन केले; पण जनजीवनावर परिणाम झाला नाही. शाळा, महाविद्यालये, कार्यालये सुरू होते. रस्त्यावर वाहने, मेट्रोसेवा सुरळीत होती.

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशात बंदचा थोडा परिणाम जाणवला. राजधानी लखनौसह अनेक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त होता. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये सुरू होती. पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. काही ठिकाणी सपा, बसपा आणि काँग्रेसने आंदोलन केले.

बिहार – हिंदुस्थान बंदचा सर्वाधिक प्रभाव बिहारमध्ये जाणवला. राज्यात जनजीवन विस्कळीत झाले. पाटणा येथे राजद, काँग्रेस, डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. रेल्वे रुळावर टायर जाळले. दरबंगा, मुझ्झफरपूर, समस्तीपूर, मुंगेर,  जहानाबाद आदी ठिकाणी बंद पाळण्यात आला. राज्यात रस्ते वाहतूक, रेल्वे बंद होती. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा बंद होत्या. अनेक कार्यकर्त्यांची मोठय़ा प्रमाणावर धरपकड करण्यात आली.

पंजाब आणि हरयाणा – पंजाबमध्ये बंदचा परिणाम जाणवला. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा बंद होत्या. पोलिसांचा सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चंदीगड, लुधियाणा, जालंदर, पतियाळा, गुरुदासपूर आदी ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी  निदर्शने केली, मोर्चे काढले. हरयाणात अंबाला, पंचकुला, रोहतक, पानिपत, यमुनानगर येथे काँग्रेसने आंदोलन केले. हरयाणात बाजारपेठा बंद होत्या.

राजस्थान – राजस्थानात शाळा, महाविद्यालये, बाजारपेठांसह सर्व व्यवहार बंद होते. जयपूर, उदयपूरसह अनेक ठिकाणी काँग्रेसने आंदोलन केले. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर राजस्थानातील मुख्यमंत्री वसुंधराराजे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 4 टक्के कपात करण्याची घोषणा रविवारीच केली आहे.

मध्य प्रदेश – मध्य प्रदेशात बंदच्या काळात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. भोपाळ, इंदूरमध्ये बाजारपेठा बंद होत्या. उज्जैनमध्ये पेट्रोल पंप बंद करतेवेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. जबलपूरमध्येही असाच वाद झाला. उज्जैन, जबलपूर, कटनी येथे जबरदस्तीने बंद करणाऱया 110 काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली.

ओडिशा – ओडिशा येथे बंदच्या पार्श्वभूमीवर 10 रेल्वे गाडय़ांची वाहतूक बंद करण्यात आली होती. अनेक शहरांमध्ये बस वाहतूक, ऑटोरिक्षा बंद होत्या.

पश्चिम बंगाल – पश्चिम बंगालमध्ये बंदचा प्रभाव जाणवला नाही. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा सुरू होत्या. रेल्वे वाहतूकही सुरू होती. काही ठिकाणी काँग्रेसने आंदोलन केले.

गुजरात – बंदला गुजरातमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये काँग्रेसने रास्ता रोको, निदर्शने केली. 300 काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

गोवा – गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेल्या बंदमध्ये प्रदेश काँग्रेस सहभागी झाली नाही. गोव्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.

कर्नाटक – जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटकात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. वाहतूक, बाजारपेठा आणि सर्व  व्यवहार बंद होते.

केरळ आणि पुद्दुचेरी – पूरग्रस्त केरळमध्ये सत्ताधारी डाव्या पक्षाने बंदची हाक दिली होती. त्यामुळे सर्व व्यवहार बंद होते. पुद्दूचेरीत बंदचा प्रभाव जाणवला.

तामीळनाडू – तामीळनाडूत बंदला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. राजधानी चेन्नईसह सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.

काँग्रेसने पुकारलेल्या बंदला समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, द्रमुक, राष्ट्रीय लोकदल, जनता दल (धर्मनिरपेक्ष), राजद, माकप, भाकप, राष्ट्रीय लोकदल, झारखंड मुक्ती मोर्चा यांचा पाठिंबा आणि सहभाग होता. तृणमूल काँग्रेसने बंदला पाठिंबा दिला; पण सहभाग नव्हता.

काँग्रेसचे ‘रामलीला’वर धरणे;अनेक पक्षांच्या नेत्यांचा सहभाग

नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आज विरोधी पक्षांनी पाळलेल्या ‘हिंदुस्थान बंद’च्या निमित्ताने काँग्रेसने रामलीला मैदानावर धरणे आंदोलन केले. बंदमध्ये उतरलेल्या 22 राजकीय पक्षांतील अनेक पक्षांचे नेते धरण्यात सहभागी झाले होते. त्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, ‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह आदी नेत्यांचा समावेश होता. आजच्या ‘बंद’मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, तृणमूल काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, द्रमुक, तेलगू देसम, राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, हिंदुस्थान अवाम पार्टी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्ष सामील झाले होते.

बिहारमध्ये 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

बंदच्या काळात बिहारमध्ये जहानाबाद येथे आजारी असलेल्या 2 वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. त्या बालिकेला उलटय़ा आणि जुलाबाचा त्रास होत होता. मात्र, 70 कि. मी. दूर पाटणा येथील रुग्णालयात जात असताना बंदमुळे वाहने रस्त्यातच अडकून पडली. रुग्णालयात वेळेवर न पोहोचल्यामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी आणि भाजपने केला आहे. मात्र, जहानाबादचे उपविभागीय अधिकारी परितोष कुमार यांनी सांगितले की, बालिकेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तिच्या वडिलांना तीनचाकी वाहन लवकर मिळाले नाही. त्यामुळे वेळेवर रुग्णालयात जाता आले नाही. बंद करणाऱया कार्यकर्त्यांनी वाहन अडविले नव्हते.

अर्थशाशास्त्रानुसार हिंदुस्थानात पेट्रोल हे 40 रुपये दराने विकले पाहिजे. त्यापेक्षा अधिक दर असेल तर जनतेचे ते शोषण ठरते. पेट्रोलचा दर इतका वाढवू नका की जनता रस्त्यावर उतरून सरकार विरोधात उठाव करील. पेट्रोलियम मंत्रालयाप्रमाणे नव्हे तर अर्थमंत्रालयाप्रमाणे विचार करा, असे पंतप्रधानांनी पेट्रोलियम मंत्र्यांना तडकवले पाहिजे-खासदार सुब्रह्मण्यम स्वामी,भाजप नेते

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा- तेलंगणात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंध्र प्रदेशात सत्ताधारी तेलगू देसम पक्ष बंदमध्ये सहभागी होता. मात्र, बदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटवर 2 रुपये कपात केली आहे.

पेट्रोल दरवाढी विरुद्ध आंदोलन

उत्तर हिंदुस्थानात आंदोलकांनी पेट्रोल भरण्याचे नॉब घेऊन तर कुठे बैलगाडीवरून सरकारचा निषेध व्यक्त केला. काही ठिकाणी ‘रास्ता रोको’ करणाऱया आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगवले.

आपली प्रतिक्रिया द्या