पीएच. डी. संशोधनाची गुणवत्ता हा चिंतेचा विषय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पीएच.डी. संपादन करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या हिंदुस्थानात आहे. पण, त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता हा चिंतेचा विषय असून, केवळ पदोन्नती मिळवण्यासाठी प्राध्यापकांकडून संशोधन आणि शोधनिबंध सादर केले जातात, ही खेदाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले.

भारती अभिमत विद्यापीठाच्या १९व्या पदवीप्रदान समारंभात डॉ. सत्यपाल सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी दीक्षान्त भाषण दिले. यावेळी कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्र. कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा नियंत्रक डॉ. विश्वास धापते, सर्व विद्या शाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. ७३३८ विद्यार्थ्यांना पदवी, ९० विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि ५० विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. सत्यपाल सिंग म्हणाले, आज विद्यापीठांमध्ये जे संशोधन होते, ते प्रयोगशाळांपुरतेच सीमित राहते. हे संशोधन समाजोपयोगी झाले पाहिजे. देशात ८६४ विद्यापीठे आहेत. उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण यासंदर्भात येऊ घातलेले धोरण येणाऱ्या सत्रात लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून डॉ. सत्यपाल सिंग म्हणाले, त्यांचे जीवन योगी होते. सर्वसामान्यांसाठी त्यांनी शिक्षणाची संधी निर्माण करून दिली, असे सांगितले. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी विद्यार्थ्यांना ध्येय आणि मूल्यांप्रश्नी अढळ राहण्याचा संदेश दिला.

कुलगुरू डॉ. साळुंखे म्हणाले, संशोधन हा भारती विद्यापीठाचा आत्मा आहे. अशी भावना ठेवून विद्यापीठात गुणवत्तापूर्ण संशोधन केले जाते. स्पर्धा आणि काळाचे भान ठेवून अद्ययावत राहण्याचा प्रयत्न आहे. देशातील नामवंत विद्यापीठांत भारती विद्यापीठात समावेश होतो. ‘नॅक’चा ए+ दर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.