आपनंतर आता ‘बाप’ही निवडणुकीच्या रिंगणात! मध्य प्रदेशात 21 ठिकाणी मैदानात उतरणार

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आपसह आता बापही रिंगणात उतरणार आहे. आदिवासीबहुल 21 ठिकाणहून हे मैदानात उतरणार आहेत. भारतीय आदिवासी पार्टी (बाप) हा राजस्थानच्या मध्यप्रदेश आणि गुजरातला लागून असलेल्या भिल्ल आदिवासीबहुल भागातील पक्ष आहे. 10 सप्टेंबर 2023 मध्ये या पक्षाची स्थापन झाली आहे. भिल्ल आदिवासी क्षेत्रातील प्रमुख समस्या आणि आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आम्ही आमच्या विचारधारेचा प्रचार करत झाबुआ, रतलाम, अलीराजपूर, धार, खरगोन, बडवाणीसह आदिवासींसाठी राखीव असलेल्या सर्व जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत, असे पक्षाचे मध्य प्रदेशातील अधअयक्ष ईश्वर गरवाल यांनी सांगितले.

आदिवासी समुदायासाठी संविधानात आणि घटनेत असलेले हक्क, अधिकार फक्त कागदावरच आहेत. ते आदिवासींपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यासाठी विधानसभेत आपल्या विचारधारेचा आमदार असायला हवा. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरून आमच्या समाजातील जास्तीतजास्त आमदार निवडून आणत विधानसभेत आपल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष आमच्या समाजाच्या प्रश्नांकडे वळवून आमच्या समाजाला त्यांचे हक्क मिळवून देणार आहोत,असेही गरवाल यांनी सांगितले.

मध्य प्रदेशात 47 जागा आदिवासी समुदायासाठी राखीव आहेत. या 47 जागांसह 80 जागांवर आदिवासी मतदारांचा प्रभआव दिसून येतो. मध्य प्रदेशात 22 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. म्हणजेच प्रत्येक पाचवा मतदार आदिवासी समुदायाचा आहे. त्यामुळे आदिवासी विकासाचा अजेंडा असलेल्या ‘बाप’ला मध्य प्रदेशातील अनेक जागांवर विजयाची आशा आहे. आदिवासी समुदाय ज्या पक्षाला पाठिंबा देतो, त्या पक्षाचे सरकार स्थापन होते, असा इतिहास आहे. आगामी निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. त्यात आता आपनेही उडी घेतली आहे. आपनंतर आता बापही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मध्य प्रदेशात निवडणुकांची चुरस वाढणार आहे.