गो एअरलाइन्सच्या व्यवस्थापनाला भारतीय कामगार सेनेचा दणका;  शेकडो कर्मचाऱयांना थकीत पगार मिळणार

  

गो एअरलाईन्सच्या कर्मचाऱयांचे मे 2023 पासूनचे थकीत पगार द्या, अशी वारंवार लिखित मागणी करूनही त्याला प्रतिसाद न देणाऱया गो एअरलाईन्सच्या व्यवस्थापनाला भारतीय कामगार सेनेने आज अखेर चांगलाच दणका दिला. भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन व्यवस्थापनाला धारेवर धरत जाब विचारला. त्यावर पुढील आठवडय़ात कर्मचाऱयांचे थकीत पगार देऊ, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहेत.

आर्थिक संकटात सापडलेल्या गो एअरलाइन्सची कारवाई सध्या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे (एनसीएलटी) सुरू असून मे 2023 पासून कंपनीने कामगारांचे पगार अद्याप दिलेले नाहीत. या संदर्भात भारतीय कामगार सेनेने व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करूनसुद्धा व्यवस्थापन कामगारांचे पगार देण्यास दिरंगाई करत आहे. त्या पार्श्वभूमीवर, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी गो एअरलाइन्स कार्यालयावर धडक देऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. यावर व्यवस्थापनाने दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिल्यामुळे आणि एनसीएलटीने कंपनीवर रिझोलेशन प्रोपेशनल प्रतिनिधी दिल्यामुळे आम्ही निर्णय घेऊ शकत नाही तरी 17 ऑगस्टला दिल्ली कोर्टाची तारीख आहे. त्या दिवशी निकाल आल्यावर त्वरित कामगारांचे पगार देऊ, असे आश्वासन व्यवस्थापनाने भारतीय कामगार सेनेला दिले आहे. यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस राजा ठाणगे, सूर्यकांत पाटील, योगेश आवळे, सहचिटणीस विजय शिर्पे, कार्यकारणी सदस्य संतोष लखमदे, गो एअरलाइन्सचे एचआर हेड जॉन्सन पुजारी, हेड गो ग्राऊंड शिवानंद नायक, एचआर मॅनेजर गो ग्राऊंड पवन श्रीवास्तव आदी उपस्थित होते.