धक्कादायक! रातोरात संरक्षण काढताच भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण शहरातील घरावर बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यानंतर शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली.

चिपळूण शहरातील पाग येथील भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घराच्या आवारात पेट्रोलच्या बाटल्या, दगड, स्टम्प फेकलेले आढळून आले आहेत. या घटनेनंतर आज सकाळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात जाऊन हल्ल्याचा जाब विचारला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, संदीप सावंत, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, माजी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, मिलींद कापडी, शौकत मुकादम, चित्रा वाघ, लियाकत शहा उपस्थित होते. भास्कर जाधव यांची सुरक्षा काढून घेतल्याचाही निषेध करताना त्यांना तत्काळ सुरक्षा व्यवस्था पुरवा अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.

या हल्ल्यामागे सरकार

शिवसेनेचा जन्म अन्यायाचा विरोध करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे शिवसैनिक त्रासाला घाबरत नाही. माझे पोलीस संरक्षण काढल्यानंतर लगेच मध्यरात्री माझ्या घरावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला सरकारनेच घडवून आणला आहे. असे कितीही हल्ले झाले तरी मी झुकणार नाही. प्राण गेले तरी शिवसेना सोडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी ठणकावले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच माझे पोलीस संरक्षण काढले गेले असणार. फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती, असा निशाणाही जाधव यांनी साधला. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स, पोलिसांच्या धाडी, एसीबीच्या धाडी, पक्ष पह्डून तुमचे समाधान झाले नाही म्हणून विरोधी पक्षातील बोलणाऱया आणि प्रतिकार करणाऱया नेत्यांना मारून तुमचा पक्ष वाढवणार असाल तर ते खुशाल करा, पण अशाने आम्ही माघार घेणार नाही, असेही जाधव यांनी निक्षून सांगितले.

आदित्य ठाकरे यांची चौकशीची मागणी

भास्कर जाधव यांच्या घराला असलेले संरक्षण काढल्यानंतर काही वेळातच घरावर हल्ला झाला. हा भ्याड हल्ला असून या हल्ल्यास राजकीय पाठबळ आहे का? कुठली यंत्रणा यामागे आहे का?, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. राजकीय जीवनात आरोप-प्रत्यारोप, टीकाटिपण्णी होत असतात. पण घरावर हल्ला करणे ही गंभीर बाब असून यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.