सीमाप्रश्नी शंभुराज देसाईंच्या तोंडाचा ‘चंबू’ झालाय, भास्कर जाधव यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला लॉक लागलं आहे. सीमा प्रश्नासाठी ज्या मंत्र्यांची नियुक्ती केली आहे ते काहीच उपयोगाचे नाहीत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच शंभुराज देसाईंच्या तोंडाचा ‘चंबू’ झालाय, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी लगावला.

सीमा भागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय होत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे महाराष्ट्राला आव्हान देण्याची भाषा करतात, मात्र यावर महाराष्ट्रातील मंत्री तोंड उघडत नाहीत. यांच्या दोन मंत्र्यांनी राणा भीमदेवच्या थाटात सांगितले की, आम्ही कर्नाटकला जाणार आहोत, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच चंद्रकांत पाटील यांच्यासारखा मजबूत मंत्री आणि अन्य एक ‘चंबू देसाई’ त्यांच्या तोंडाचा ‘चंबू’ झाला. सकाळ-संध्याकाळ शिवसेनेवर बोलणारे कर्नाटकच्या बाबतीत ‘चंबू’ का झाले, असे भास्कर जाधव म्हणाले.