
धुळय़ाच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोटय़वधींच्या रोकडप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना पत्र दिले आहे.
धुळय़ातील घटनेने महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला आणि विधिमंडळाच्या पवित्रतेला कलंक लावला आहे. या प्रकरणात विधिमंडळाच्या अंदाज समिती सदस्यांवर गंभीर आरोप झाले आहेत. सापडलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली होती अशी चर्चा आहे. ती समितीतील सदस्यांना देण्यासाठी ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. तसेच ज्या खोलीत रक्कम आढळली ती अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या नावावर आरक्षित होती. हे अत्यंत धक्कादायक असून विधिमंडळाच्या व्यासपीठाचा सत्ताधाऱयांकडून डीलसाठी वापर केला जातोय हे निंदनीय आहे, असे भास्कर जाधव यांनी या पत्रात म्हटले आहे. कोणताही आमदार, समिती सदस्य किंवा शासकीय कर्मचाऱयाचा या गैरप्रकारात सहभाग असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले आहे.