चिकन खाल्ले आणि घात झाला, एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा; चिमुकलीचा मृत्यू

जेवणाला चव यावी यासाठी आणलेल्या चिकन मसाल्याने भाईंदरच्या जय बजरंग नगर येथील मौर्या कुटुंबाचा घात केला. जेवणानंतर या कुटुंबातील सहा जणांना उलट्या, मळमळ आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु या कुटुंबातील एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा तडफडून मृत्यू झाला. दीपाली मौर्या असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. या कुटुंबातील पाच सदस्य शुद्धीवर आले असून ही विषबाधा अन्नातूनच झाली असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील बजरंग नगर येथील रमेश मौर्या यांच्या घरी उकडलेली अंडी, भात आणि वडे असा बेत होता. जेवणाला चव यावी यासाठी त्यांनी बाहेरून चिकन मसाल्याची डिश विकत घेतली. या सर्वांनी चिकन मसाला जेवताना खाल्ला. त्यानंतर काही वेळातच अख्ख्या कुटुंबाला विषबाधा होऊन उलटी, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यात रमेश मौर्या (३०), पत्नी नीलम मौर्या (२८), मुली चाहत मौर्या (८), अनामिका (६), दीपाली (३), मेहुणा राजकुमार मौर्या (४५) यांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दीपाली मौर्या हिचा विषबाधेमुळे तडफडून मृत्यू झाला तर चाहत मौर्या आणि अनामिका मौर्या यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील जे जे रुग्णाल यात हलवण्यात आले आहे. उर्वरित तिघे शुद्धीवर आले असून त्यांच्यावर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फॉरेन्सिक टीमला पाचारण

विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. त्यानंतर अन्नाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. कोणत्या अन्नातून विषबाधा झाली आहे याचा तपास आम्ही करीत आहोत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.

डाळिंबाचे दाणे श्वासनलिकेत अडकून चिमुरड्याचा मृत्यू

डाळिंबाचे दाणे श्वासनलिकेत अडकून अडीच वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना भाईंदरमध्ये घडली. काशीनगर येथील देवदर्शन अपार्टमेंटमधील महेश पिरदानकर यांचा मुलगा नितेश डाळिंबाचे दाणे खात असताना ही हृदयद्रावक घटना घडली.