
सामना प्रतिनिधी । मुंबई
बकाल वस्ती, अस्वच्छता, चिंचोळ्या गल्ल्या, मोडकळीस आलेल्या इमारती, जुनाट गाळे, सततची वाहतूककोंडी या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या भेंडीबाजाराने कात टाकली आहे. तेथील क्लस्टर डेव्हलपमेंटचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून लवकरच रहिवासी राहायला जाणार आहेत. सध्या 80 पेक्षा अधिक दुकानदार पुनर्विकास झालेल्या जागी परतले आहेत.
भेंडीबाजार येथील 16.5 एकर जागेवर समूह पुनर्विकास म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रकल्प सैफी बुऱर्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने हाती घेतला आहे. प्रकल्पाला म्हाडा आणि नाईट फ्रँक या रियल इस्टेट कंपनीचे सहकार्य लाभले आहे. या प्रकल्पातून 20 हजारांपेक्षा अधिक लोकांचा आणि व्यावसायिक गाळेधारकांचा प्रश्न सुटणार आहे. सध्या 36 आणि 42 मजली दोन टॉवर उभे करण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसरीकडे मोडकळीस आलेल्या इमारती पाडण्याचे कामही सुरू आहे.
दुसऱया टप्प्याचे काम सुरू
क्लस्टर डेव्हलपमेंटच्या दुसऱया टप्प्याचेही काम सुरू झाले आहे. 3200 पैकी 2800 भाडेकरूंनी जागा सोडली आहे. मात्र काही मूठभर भाडेकरू अवाजवी मागण्यांसाठी अडून मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आपला जीव धोक्यात घालत आहेत. अशा भाडेकरू आणि घरमालकांना समजवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सैफी बुऱर्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने सांगितले आहे.
पहिल्या टप्प्याच्या पुनर्विकासात 600 पेक्षा अधिक कुटुंबांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले असून ते लवकरच नव्या इमारतीत राहावयास येणार आहेत.
पुनर्विकासानंतर रहिवाशांना 18.5 मीटरचे रुंद रस्ते, मोकळी जागा, बगीचे, पार्किंगची जागा अशा सोयीसुविधा मिळणार आहेत.
आपल्या हक्काच्या नव्या गाळ्यात परतल्याने खूप आनंद वाटत आहे. इथे आम्हाला देण्यात आलेल्या आधुनिक सोयीसुविधांमुळे आमचा व्यवसाय वाढीस लागेल.
– बाबुलाल जैन, कापड व्यापारी, भेंडीबाजार



























































